नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पुण्यानजीकच्या वादग्रस्त लवासा प्रकल्पाच्या जमीन खरेदीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आली आहे. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने लवासा कॉर्पोरेशन आणि शरद पवार यांच्या कुटुंबीय, तसेच इतर प्रतिवाद्यांना नोटीस काढली आहे.
लवासा कॉर्पोरेशनला या प्रकल्पासाठी जमीन खरेदी करण्यास अनुमती देण्यात आली होती. या अनुमतीला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. मुंबई उच्च न्यायालयाने या आव्हान याचिका फेटाळल्या होत्या आणि जमीन खरेदी अनुमती वैध ठरविली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला नाशिक येथील रहिवासी नानासाहेब जाधव यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने या वर्षीच्या फेब्रुवारीतही नोटीस पाठविली होती. आता पुन्हा नोटीस पाठविण्यात आली आहे. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा रंगणार अशी चिन्हे दिसत आहेत. लवासाने केलेली जमीन खरेदी त्यावेळीही वादग्रस्त ठरली होती. त्यामुळे या खरेदीचा आव्हान देण्यात आले होते.
राजकीय प्रभावामुळे मान्यता ?
या प्रकल्पाशी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांचा जवळचा संबंध आहे, असा आरोप आहे. पवार यांच्या राजकीय प्रभावामुळेच या बेकायदेशीर प्रकल्पाच्या कॉर्पोरेशनला जमीन खरेदी करण्यासाठी अनुमती देण्यात आली होती, असा आरोप नानासाहेब जाधव यांनी केला आहे. शरद पवार यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे, महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि शरद पवार यांचे पुतणे अजितदादा पवार, राज्य सरकारचे अधिकारी आणि महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ यांनी जनहिताला डावलून या प्रकल्पाला जमीन खरेदी करण्यासाठी मान्यता मिळवून दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाचे निरीक्षण
शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या विरोधात याचिकेत करण्यात आलेल्या आरोपांचे खंडन त्यांनी केलेले नाही. त्यामुळे ते आरोप खरे मानावयास हवेत. तथापि, मुंबई उच्च न्यायालयात याचिका बऱयाच उशिरा सादर करण्यात आली आहे. त्यामुळे आता परिस्थिती पूर्वीसारखी करणे अशक्य आहे. त्यामुळे जास्त हानी होण्याची शक्यता आहे, असे निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने प्रकल्पाविरोधातील याचिका फेटाळल्या होत्या. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयात नव्याने हेच आरोप करण्यात आले असून नोटीसा पाठवण्यात आल्याने या प्रकरणावरची धूळ झटकली जाणार असल्याचे तज्ञांचे मत आहे.