चंदीगढ / वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशनंतर आता हरियाणामध्येही लव्ह जिहादविरोधात कडक कायदा निर्माण करण्याबाबत विचार सुरू आहे. याबाबत हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी स्वत: ट्विटद्वारे माहिती दिली आहे. फरिदाबादच्या वल्लभगड येथे झालेल्या निकिता तोमर हत्याकांडानंतर लव्ह जिहादचा मुद्दा देखील चांगलाच चर्चेत आला आहे. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल विज यांनी ट्विट करत, हरियाणामध्ये लव्ह जिहाद विरोधात कायदा निर्माण करण्यावर विचार सुरू असल्याचे स्पष्ट केले. फरिदाबाद हत्याकांडाची सुनावणी जलदगती न्यायालयात करण्याचा निर्णय हरियाणा सरकारने अगोदरच घेतलेला आहे. याबाबत बोलताना आरोपींना लवकरच शिक्षा होईल, असे ट्विटही गृहमंत्री अनिल विज यांनी केले आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमधील दिवसेंदिवस वाढत्या ‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणांची अत्यंत गंभीरतेने दखल घेतलेली दिसत आहे. शनिवारीच त्यांनी याप्रकरणी कडक कायदा करण्याचे सुतोवाच केले होते. अलाहाबाद न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा दाखला देत, लव्ह जिहाद विरोधात कडक कायदा तयार केला जाणार असल्याचे त्यांनी भरसभेत सांगितले होते. तसेच, महिलांच्या सन्मानाशी खेळणाऱयांना अद्दल घडविण्याचा इशाराही दिला होता.