नियोजनाचा अभाव आणि वशिलेबाजीमुळे वृद्धांना, महिलांना त्रास
प्रतिनिधी /येळ्ळूर
कोरोना लस मिळविण्यासाठी बऱयाच ठिकाणी धडपड सुरू आहे. येळ्ळूरमध्येही रात्री 3 पासूनच अनेकांनी रांगा लावल्या. अक्षरशः लस वितरणाचा सावळा गोंधळ येळ्ळूरमध्ये दिसून आला. कोणतेही नियोजन नाही यातच काही जणांनी वशीलाबाजी करुन वृध्दांना आणि महिलांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. यामुळे ग्रामस्थांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून लसीकरण मोहीम सुरू आहे. सर्वसामान्य जनतेच्या पैशातूनच ही लस दिली जात आहे. मात्र काही जण ती लस आम्हीच उपलब्ध करत असल्याचे भासवत आहेत. वास्तविक सर्वांनाच लस देणे गरजेचे आहे. येळ्ळूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर तसेच इतर कर्मचारी लस उपलब्ध झाल्यानंतर ती देण्यासाठी धडपडत आहेत. मात्र त्यामध्ये हस्तक्षेप होत असल्याचा प्रकार घडत आहे.
येळ्ळूर प्राथमिक आरोग्य केंद्र, श्री चांगळेश्वरी मंदिर, लक्ष्मी मंदिर, परमेश्वर मंदिर, मराठी शाळा येळ्ळूरवाडी या ठिकाणी डोस देण्यासाठी आयोजन करण्यात आले. मात्र नियोजन नसल्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागला. या प्रकारामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. सरकारनेच याची उपलब्धता करणे गरजेचे आहे. सर्वांनाच घरोघरी जाऊन केवळ आधारकार्ड घेऊन त्यावरील मोबाईल क्रमांक घेऊन तो ऑनलाईनवर अपलोड करुन लस दिली पाहिजे. लस घेण्यासाठी कोणताही अर्ज भरण्याची काहीही गरज नाही. असे असताना अर्ज भरुनही घेतले जात आहेत.
याबाबत कोणीही तक्रार केली तर ‘तुम्हाला लस मिळणार नाही’ म्हणून त्यांना माघारी पाठविले जात आहे. सुरूवातीपासूनच लस वितरणामध्ये सावळा गोंधळ सुरू आहे. याबाबत अनेक संघटनांनी जिल्हाधिकाऱयांना निवेदन दिले आहेत. तरी देखील अधिकारी या वादामध्ये पडायचे नाही म्हणून नामानिराळे राहत आहेत. मात्र यामुळे सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. येळ्ळूरमध्ये लसीकरणावेळी सुरू असलेल्या सावळय़ा गोंधळामुळे मोठी समस्या निर्माण झाली असून आरोग्य विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.