नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. कोरोना व्यवस्थापनात सैन्याकडून सुरु असलेल्या मदतीच्या विविध उपक्रमांवर दोघांनी चर्चा केली. पंतप्रधान कार्यालयाने याबाबत माहिती दिली आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हवाई दल प्रमुख आणि सीडीएस बिपिन रावत यांच्यासमवेत बैठक घेतली.
लष्करप्रमुखांनी यावेळी पंतप्रधान मोदींना सांगितले की, सैन्य आपली रुग्णालये सर्वसामान्यांसाठी खुली करत आहे. जिथे शक्य असेल तेथे सामान्य नागरिक लष्करी रुग्णालयात जाऊ शकतात. कोरोनाच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सैन्य देशाच्या विविध भागात तात्पुरती रुग्णालये बांधत आहे. तसेच जेथे आयात केलेले ऑक्सिजन टँकर व वाहने व्यवस्थापनात तज्ज्ञांचे कौशल्य आवश्यक आहे, तेथे सैन्याकडून मदत पुरवली जात असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.
लष्कराचे वैद्यकीय कर्मचारी विविध राज्य सरकारांच्या मदतीसाठी तैनात करण्यात आले आहेत. यासोबतच लष्कर देशाच्या विविध भागात तात्पुरती रुग्णालये सुरू करत असल्याची माहिती देखील त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली.