पँगाँग सरोवराच्या स्थितीचा घेतला आढावा
वृत्तसंस्था / लडाख
पूर्व लडाख सीमेवर चीन विरुद्ध संघर्षाची स्थिती कायम असताना लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी बुधवारी लडाखचा दौरा केला. त्यांनी एलएसी आणि पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱयावरील परिस्थितीचा आढावा घेतला. बुधवारी सकाळी 8.30 वाजता ते लडाखच्या फॉरवर्ड भागामध्ये पोहोचले. त्यानंतर त्यांनी वरिष्ठ अधिकाऱयांची भेट घेत सविस्तर चर्चाही केली. त्यानंतर विविध ठिकाणांची पाहणी करत सैन्यबळाचीही माहिती जाणून घेतली.
लष्करप्रमुख नरवणे यांनी रेचिंग ला सह फॉरवर्ड भागांना भेट दिली. आपल्या सैन्याच्या तयारीबाबत जीओसी, फायर ऍण्ड फ्युरी कॉर्प्स आणि अन्य स्थानिक कमांडर्सनी त्यांना माहिती दिली. लष्कराने ट्विटर हँडलवरून ही सर्व माहिती दिली आहे.
वादाच्या मुद्दय़ावरून भारत आणि चीन यांच्यात चर्चेच्या फेऱया सुरूच आहेत. दोन महिन्यांच्या खंडानंतर 18 डिसेंबरला लडाख सीमेवरील स्थितीसंदर्भात भारत आणि चीनमध्ये राजनैतिक चर्चा झाली होती. या चर्चेअंतीही कुठलाही अंतिम तोडगा दृष्टीपथात आला नसल्याने द्विपक्षीय वाद कायम आहे. पँगाँग भागात दादागिरी करणाऱया चीनला भारताने प्रत्येक आघाडीवर जशास तसे उत्तर दिले आहे. दोन्ही बाजूचे जवळपास 50 हजार सैनिक इथे तैनात आहेत. दोन्ही देशांनी सर्व अत्याधुनिक शस्त्र सज्ज ठेवली असून लष्करप्रमुखांनी लडाखमधील स्थितीचा आढावा घेतला आहे.