नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतीय लष्करातील शीख सैनिकांना भारताविरोधात बंड करण्यासाठी चिथावणी देण्याचे कट-कारस्थान रचल्याची बाब उघड झाली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) दाखल केलेल्या आरोपपत्रातून यासंबंधीचा खुलासा झाला आहे. अमेरिकास्थित ‘शीख फॉर जस्टिस’ (एसएफजे) या फुटीरतावादी संघटनेने खलिस्तानच्या उद्दिष्टासाठी एका धोकादायक कारस्थान रचल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे देशाच्या सुरक्षेला आणि दक्षतेला तडा जाऊ शकतो, अशी भीती एनआयएने व्यक्त केली आहे.
एनआयएने दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये 16 संशयितांची नावे समाविष्ट आहेत. त्यात ‘एसएफजे’चा नेता गुरपतवंत सिंग पन्नू (न्यूयॉर्क) खलिस्तान टायगर फोर्सचा प्रमुख हरदीप सिंग निज्जर (कॅनडा) आणि बब्बर खालसा इंटरनॅशनलचा प्रमुख परमजीत सिंग (ब्रिटन) यांची नावे आहेत. जुलै महिन्यात ‘यूएपीए’ कायद्यांतर्गत या चौघांचा दहशतवाद्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे. यूएपीए अंतर्गत ‘शीख फॉर जस्टिस’ संघटनेवर बंदी असून ही संघटना खलिस्तानी दहशतवादी संघटनांचा चेहरा असून या संघटनेचे पाकिस्तानशी लागेबांधे असल्याचा दावाही एनआयएने केला आहे. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सऍप या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून ‘एसएफजे’ स्वतंत्र खलिस्तानच्या उद्दिष्टासाठी शांतता-सौहार्द बिघडवणे, अस्थिरता वाढवण्यात सक्रिय असल्याचे एनआयएने म्हटले आहे.