पाच किलो आयईडी स्फोटके हस्तगत : दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला
श्रीनगर / वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानकडून वारंवार ड्रोनच्या मदतीने लष्करी तळांवर हल्ले करण्याचा प्रयत्न सुरु आहे. शुक्रवारीही पाकिस्तानकडून ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. मात्र भारतीय जवानांनी अखनूर भागात घुसलेले दहशतवाद्यांचे ड्रोन पाडल्याने घातपाताचा मोठा कट उधळण्यात आला. जम्मू-काश्मीरमधील अखनूर सेक्टरच्या कानाचक येथे शुक्रवारी पहाटे ड्रोनवर अचूक गोळीबार करून ते पाडण्यात आले. सदर ड्रोनमधून पाच किलो आयईडी हस्तगत करण्यात आली आहेत.
मागील महिन्यापासून जम्मू-काश्मीर भागात ड्रोनचा वावर वाढला होता. तसेच एका हवाई तळावरही ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हाही असे प्रकार सुरू आहेत. शुक्रवारी पुन्हा एकदा ड्रोन भारतीय सीमेच्या आठ किलोमीटर आतपर्यंत घुसले. पाकिस्तान ड्रोनच्या मदतीने आयईडी पुरवून दहशतवादी मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. या माहितीच्या आधारे लष्कराने रणनिती आखली होती आणि पाकिस्तानचे ड्रोन पाडले.
दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद अखनूरजवळ ड्रोनच्या मदतीने हल्ला करणार आहे, अशी माहिती गुप्तचर विभागाकडून सुरक्षा यंत्रणांना देण्यात आली होती. त्या माहितीच्या आधारे रणनिती आखून मोठा कट उधळण्यात आला. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास ड्रोन पाडले. यावेळी पाकिटबंद आयईडी उचलण्यासाठी कुणीतरी येईल याची आम्ही वाट बघत होतो. मात्र तिथे कुणीही आले नाही. आयईडी कुठेतरी प्लान्ट करण्याचा शत्रूंचा कट होता. मात्र भारतीय लष्कराने दहशतवाद्यांचा कट हाणून पाडला. हे ड्रोन चीन आणि तायवानमधील स्पेअरपार्टने तयार करण्यात आले असल्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक मुकेश सिंह यांनी सांगितले.
6 फूट लांब, 17 किलो वजन
उद्ध्वस्त करण्यात आलेले ड्रोन 17 किलोचे असून त्याची लांबी 6 फूट इतकी आहे. त्याचे भाग चीन, हाँगकाँग आणि तैवानमध्ये बनविलेले आहेत. अशाच प्रकारचे ड्रोन यापूर्वी कठुआ येथे सापडले होते. मागील दीड वर्षात 16 एके 47 रायफल, तीन एम-4 रायफल, 34 पिस्तूल, 15 ग्रेनेड आणि 18 आयईडी हस्तगत करण्यात आले आहेत. काही ड्रोनच्या मदतीने पैसेही पाठवण्यात आले होते. त्यानुसार जवळपास 4 लाखांची रोख हस्तगत करण्यात आली आहे.
जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबा ड्रोनच्या मदतीने काश्मीरमध्ये हल्ले करण्याचा कट रचत आहे, असेही मुकेश सिंह यांनी सांगितले. 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जम्मू-काश्मीर एअरफोर्स स्टेशनजवळ अँटी ड्रोन सिस्टम लावले आहे. यापूर्वी 27 जूनला भारतीय वायुसेनेच्या तळावर दहशतवाद्यांनी ड्रोनच्या मदतीने हल्ला केला होता. या हल्ल्यात दोन जवानांना किरकोळ जखम झाली होती. त्यानंतर काश्मीर खोऱयात कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.
सोपोरमध्ये ‘तोयबा’चे दोन दहशतवादी ठार
जम्मू-काश्मीरच्या सोपोर येथे चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले. हे दोघे पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते. त्यातील एकाची ओळख पटली असून त्याचे नावा फैयाज वार असे आहे. खुनाच्या अनेक घटनांसह दहशतवादी कारवायांमध्ये तो आरोपी होता. दहशतवाद्यांकडून मोठय़ा प्रमाणात दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
जम्मूमधील ‘ड्रोन’च्या कारवाया…
26 जून : जम्मू हवाई दल तळावर 26 जूनच्या रात्री ड्रोन हल्ला झाला. यात हवाई दल स्थानकाच्या छताचे नुकसान झाले. तसेच दोन जवान जखमी झाले.
27 जून : जम्मूमधील कालूचक मिलिटरी बेसमध्ये रात्री ड्रोन नजरेस पडली. त्यावर सुरक्षा दलाने गोळीबार केला, पण तो अंधारात गायब झाला होता.
28 जून : जम्मूमधील सुजवान मिलिटरी स्टेशनजवळ 28 जून रोजी संशयित ड्रोन निदर्शनास आले. कुंजवाणी आणि कालूचक भागातही ड्रोन नजरेस पडले.