ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरमध्ये पुलवामा पोलीस आणि सुरक्षा दलाने केलेल्या संयुक्त कारवाईत लष्कर-ए-तोयबाशी संबंधित एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. शमीम सोफी असे अटक केलेल्या दहशतवाद्याचे नाव असून, तो निकोलोराचा रहिवासी आहे. सुरक्षा दलांनी त्याच्याकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा यांसह आक्षेपार्ह साहित्य जप्त केले आहे.
दरम्यान, आज सकाळी उत्तर काश्मीरमधील शोपियां जिह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. या दहशतवाद्याची ओळख अद्याप पटली नाही.
पाकिस्तान लष्कर, आयएसआय आणि लष्कर-ए-तोयबा काश्मीरमध्ये जिहादच्या नावाखाली दहशत पसरवण्याचा सापळा विणत आहेत. या दहशतवादी संघटना गरीब तरुणांना लक्ष्य करून त्यांना आपल्या जाळ्यात ओढतात. उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला येथील उरी सेक्टरमध्ये काही दिवसांपूर्वी पकडण्यात आलेल्या पाकिस्तानी लष्कराचा दहशतवादी बाबर याने यासंदर्भात खुलासा केला होता.