ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये रविवारी रात्री चकमक झाली. या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर मुसादीर पंडित याच्यासह तिघांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आले. मुसादीर पंडित याने 3 पोलीस, 2 नगरसेवकांची हत्या केली होती. काश्मीरचे आयजी विजय कुमार यांनी यासंदर्भात माहिती दिली.
विजय कुमार म्हणाले, सोपोरमधील गुंड ब्रथ परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानुसार सुरक्षा दलाने शोधमोहिम हाती घेतली. गुंड ब्रथ परिसराला सुरक्षा दलांनी वेढा दिल्यानंतर रविवारी रात्री उशिरा सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सरू झाली. या चकमकीत लष्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरसह तिघांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले असून, एकाची ओळख पटली आहे. आसरार आलीस अब्दुल्ला असे या दहशतवाद्याचे नाव असून, तो मूळचा पाकिस्तानचा रहिवासी आहे. गुंड ब्रथ परिसरात सुरक्षा दलाकडून अद्याप शोधमोहिम सुरू आहे.