भारतीय वंशाच्या संशोधिका नीता पटेल यांच्याकडे नोवावॅक्स प्रकल्पाचे नेतृत्व
लसनिर्मितीचा आतापर्यंतचा इतिहास पुरुषांच्या नावावर राहिला आहे. परंतु कोरोनाकाळात अस्तित्वात येत असलेल्या लसीची गाथा महिलांनीच रचली आहे. मॉडर्ना असो किंवा फायजर-बायोएनटेक किंवा नोवावॅक्स सर्व कंपन्यांच्या लसीला मूर्त स्वरुप देण्यात महिला वैज्ञानिकांची भूमिका महत्त्वाची आहे.
अमेरिकेत लसनिर्मितीत ज्या महिला वैज्ञानिकांनी संशोधन केले, त्या सर्व अन्य देशांमधून येत अमेरिकेत स्थायिक झाल्या आहेत. या वैज्ञानिकांनी एमआरएनएद्वारे लस निर्मिती करण्यास यश मिळविले आहे. एमआरएनद्वारे लसनिर्मिती करण्यामागील महत्त्वाचे काम कॅटलिन कारिको यांनी केले आहे.
कारिको या हंगेरीत जन्मल्या होत्या आणि आरएनए संबंधी संशोधनासाठी त्या अमेरिकेत आल्या होत्या. संशोधनाच्या प्रारंभी त्यांच्या कारकीर्दीत अनेक उतारचढाव आले, संशोधनासाठी निधी जमवावा लागला, नंतर कर्करोगाला सामोरे जावे लागल तरीही त्यांनी संघर्ष थांबविला नाही. ड्रय़ू विसमॅन यांच्यासोबत मिळून आरएनए सामग्रीला शरीरात अतिरिक्त इन्फ्लेमेशनशिवाय सोडण्याची पद्धत त्यांनी विकसित केली आहे. त्यांचे हे यश अनन्यसाधारण मानण्यात येते.
कारिको आता बायोएनटेक कंपनीसोबत काम करत आहेत. मॉडर्नाच्या लसीची चाचणी वॉशिंग्टन विद्यापीठाच्या लीजा ए. जॅक्सन यांच्या नेतृत्वाखाली पार पडली आहे. नोवावॅक्सची लस तयार करण्यात वैज्ञानिक नीता पटेल यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे.
32 वर्षांपूर्वी अमेरिकेत
नोवावॅक्सचे मुख्यालय मेरीलँडमध्ये आहे. नोवावॅक्स देखील नव्या कल्पनेवर आधारित आहे. यात मोथ सेल यंत्रणेचा वापर करण्यात आला आहे. नोवावॅक्सच्या पथकाचे नेतृत्व नीता पटेल यांनी केले आहे. पटेल या मूळच्या गुजरातच्या रहिवासी आहेत. त्यांच्या पथकात सर्व महिला वैज्ञानिक आहेत. नीता 4 वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचा क्षयरोगाने मृत्यू झाला होता. वडिलांच्या मृत्यूनेच वैद्यकीय क्षेत्रासंबंधी रुची निर्माण केली होती.