माहितीचे होतेय आदान-प्रदान : 3 लसींवर संयुक्त कार्य सुरू
वॉशिंग्टन / वृत्तसंस्था
कोरोना संकटाला तोंड देण्यासाठी भारत आणि अमेरिका दोघेही मिळून काम करत आहेत. या संकटाच्या पार्श्वभूमीवर समन्वय आणि माहितीचे आदान-प्रदान करण्यावर भर दिला जात आहे. दोन्ही देशांच्या कंपन्या सद्यकाळात किमान 3 लसींच्या निर्मितीवर संयुक्तपणे काम करत आहेत. भारतातील सर्वोच्च आरोग्य विषयक यंत्रणा इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) अमेरिकेच्या संस्थांना सहकार्य करत असल्याचे उद्गार अमेरिकेतील भारतीय राजदूत टी.एस. संधू यांनी काढले आहेत.
आयसीएमआर आणि सीडीसी-एनआयएच (अमेरिका) अनेक वर्षांपासून परस्परांना सहकार्य करत आले आहेत. तीन वर्षांपूर्वी दोघांनी मिळून रोटा विषाणूवरील लस विकसित केली होती. ही लस भारत, अमेरिकेसह अनेक देशांसाठी उपयुक्त ठरली होती असे संधू म्हणाले.
सद्यकाळातही भारत आणि अमेरिका मिळून काम करत आहेत. भारत आणि अमेरिकेच्या कंपन्या किमान 3 लसींच्या प्रकल्पांकरता कार्यरत आहेत. याशिवाय भारत पुरवठासाखळीचा महत्त्वाचा हिस्सा आहे. या संकटाच्या काळात भारत एक विश्वासार्ह भागीदार असल्याचे अमेरिकेला दिसून आल्याचे संधू यांनी म्हटले आहे.
भारताने अत्यावश्यक औषधांच्या निर्यातीवरील बंदी हटवून अमेरिकेला पुरवठा केला होता. भारत हायड्रॉक्सी क्लोरोक्विन औषधाचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आवाहनानंतर भारताने या औषधाच्या निर्यातीवरील बंदी हटविली होती. अमेरिकेसह अनेक देशांना भारताने हे औषध पुरविले आहे.