अचूक बातमी “तरुण भारत”ची, बुधवार, 17 नोव्हेंबर 2021, सकाळी 10.15
● आज 30 लाखांचा टप्पा पूर्ण होण्याची अपेक्षा
● जिल्ह्यात कोरोनाची अल्पवाढ सुरूच
● वातावरणातील बदलाने साथीचे आजार वाढले
● वृद्ध, बालकांनी काळजी घेण्याची गरज
● गत 24 तासात कोरोनाचे 23 रूग्ण
● पॉझिटिव्हीटी रेट 0.77 वर घसरला
सातारा / प्रतिनिधी :
जिल्ह्यात लसीकरणाची गती वाढवण्यात प्रशासनाला यश आले असून, घर टू घर लसीकरण मोहिमेचा फायदा होत आहे. या मोहिमेमुळे रांगेत ताटकळत उभे राहण्याची इच्छा नसलेल्यांची गैरसोय दूर झाली आहे. त्यामुळे कालपर्यंत जिल्ह्यात 29 लाख जिल्हावासियांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतल्याची नोंद झाली. आज बुधवारी हा आकडा 30 लाखांवर जाईल असा विश्वास आरोग्य विभागाकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे जिल्ह्याने लसीकरणाचा एक मोठा टप्पा पूर्ण केला आहे असे म्हणायला सध्या वाव आहे. लसीकरणाचा वेग आणि जिल्हावासियांचे सहकार्य कायम राहिल्यास नवे वर्ष उजाडेपर्यंत जिल्ह्यात 50 लाख जिल्हावासियांचे लसीकरण पुर्ण होईल असा अंदाज सुखावणारा ठरत आहे. दरम्यान जिल्ह्यात गेल्या 24 तासात 29 हजार 72 संशयितांच्या चाचण्या झाल्या असून 23 रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. लसवंतांचा आकडाही 24 तासात 15 हजार 823 झाला आहे.
दररोज 10 हजारांवर लसीकरणाचे लाभार्थी
लसीकरण सुरू झाल्यापासून दररोज 10 हजार लाभार्थ्यांचे लसीकरण होत होते. मात्र मंगळवारी हा आकडा 15 हजाराकडे सरकला. मंगळवारी देखील दिवसभरात तब्बल 15 हजार 823 जणांनी लस घेतली आहे. यामुळे जिल्हय़ातील लस घेणाऱ्या नागरिकांची एकूण संख्या 29 लाख 48 हजार 037 एवढी झाली आहे. यामध्ये पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 19 लाख 88 हजार 594 एवढी झाली असून दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 9 लाख 59 हजार 443 एवढी झालेली आहे.
वातावरणातील बदलाने किरकोळ आजार
गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दोन दिवसात थंडीचा कडाका वाढला होता. या आठवड्यात थंडी काहीसी कमी झाली आणि ढगाळ वातावरण तयार झाले. उकाड्याने लोक हैराण झाले. मंगळवारपासून जिल्ह्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावल्याने वातावरणातील अचानक होत असलेला बदलाने नागरिकांना सर्दी, खोकल्यासह इतर किरकोळ आजारांचा सामना करावा लागत आहे. यामधे लहान मुले, वृद्धांची संख्या असून या वर्गाने सध्याच्या वातावरणात काळजी घेण्याची गरज आहे असे मत वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केला आहे.
मंगळवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण नमुने 22,66,807
एकूण बाधित 2,51,727
कोरोनामुक्त 2,44,118
एकूण मृत्यू 6,462
सक्रीय रुग्ण 305
मंगळवारी जिल्हय़ात
बाधित 23
कोरोनामुक्त 65
मृत्यू 01