ऑनलाईन टीम / मुंबई :
लशींचा साठा उपलब्ध नसल्याचा चांगलाच फटका मुंबईतील लसीकरणाला बसला आहे. त्यामुळे पुरेशा लससाठाअभावी शुक्रवारी मुंबई महापालिकेची लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर आज व उद्याही लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे लस घेण्यासाठी मुंबईकरांना आता थेट सोमवारची वाट पाहावी लागणार आहे.
आज 10 जुलै रोजी मुंबई महानगरपालिका व शासकीय लसीकरण केंद्रांमध्ये लसीकरण केले जाणार नाही. तसेच, 11 जुलै रोजी साप्ताहिक सुट्टी म्हणून लसीकरण बंद राहिल, असे ट्वीट मुंबई महानगरपालिकेने केले आहे. तसेच, लसीकरण प्रक्रियेच्या पुढील सूचना आम्ही देत राहू, असे मुंबई पालिकेने म्हटले आहे. त्यामुळे शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी लसीकरण बंद राहणार आहे.
पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, ‘लशींचा साठा अधिक प्रमाणात देण्याची मागणी आम्ही वारंवार करत आहोत. वेगाने लसीकरण करण्याची आमची तयारी असूनही पुरेसा साठा नसल्यामुळे अनेक केंद्रांवर क्षमतेपेक्षा कमी साठा द्यावा लागतो. त्यामुळे नागरिकांना लस न घेताच परत जावे लागते. ही स्थिती बदलण्यासाठी जास्तीचा साठा एकाच वेळी देण्यासाठीही पाठपुरावा केला जात आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, मुंबईत आतापर्यंत 59 लाख 29 हजार जणांनी लस घेतली आहे. त्यापैकी, 46 लाख 81 हजार 780 जणांनी लशींची पहिली मात्रा घेतली आहे. तर 12 लाख 47 हजार 410 जणांनी दुसरी मात्रा घेतली आहे.