आरोग्य सचिव अमित सतीजा यांची माहिती
प्रतिनिधी/ पणजी
कोविड 19 च्या लसीकरणाच्या तयारीचा भाग म्हणून शनिवारी राज्याच्या विविध भागात प्राथमिक अभ्यास (ड्राय रन) करण्यात आले. पणजी, खोर्ली व हळदोणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हा प्रयोग करण्यात आला व तो पूर्ण यशस्वी झाला अशी, माहिती आरोग्य सचिव अमित सतिजा यांनी दिली आहे.
या मॉकड्रिल दरम्यान आवश्यक रणनीती व सर्व नियमांचे पालन करण्यात आले. कोविड19 लसीकरण प्रमाणपत्र देण्याची प्रक्रियाही तपासण्यात आली. या प्रयोगात आरोग्य कर्मचाऱयांनीही सहभाग घेतला, असे आरोग्य सचिवांनी सांगितले.
कोविड 19 लसीच्या साठवणुकीसाठी कोल्ड स्टोरेजची व्यवस्था असून त्याची मंजुरी मिळणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने लस साठवणुकीसाठी अतिरिक्त आइस बँकसाठी मान्यता दिली आहे. लस साठविण्यासाठी गरज भासल्यास खासगी इस्पितळांचेही सहकार्य घेतले जाईल, असेही सतिजा यांनी पुढे सांगितले.
दरम्यान, केंद्र सरकारने (एमईसी) शुक्रवारीच कोविशिल्ड लसीच्या आपत्कालीन वापरास मान्यता दिली आहे. सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया या कंपनीतर्फे या लसीचे उत्पादन करण्यात आले असून पुढील काही दिवसात लसीकरण प्रारंभ करण्यात येणार आहे.