वारणानगर / प्रतिनिधी
पन्हाळा तालुक्यातील कळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहाय्यिका लसीकरणाचे नंबर लावते. तिला अर्वाच्य शब्दात वाद घालत तसेच तिच्याबद्दल सोशल मिडियावर बदनामी काणारा संदेश पाठवल्याबद्दल मल्हारपेठ ता. पन्हाळा येथील ग्रामपंचायतीच्या शिपायावर कळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. प्रफुल्ल उर्फ पप्पु नारकर असे त्याचे नाव आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र कळेच्या आरोग्य साहाय्यिका महिराज सिंकदर जमादार यांनी याबाबत फिर्याद नोंदवली आहे.
नारकर हा दि. २९ रोजी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास कळे प्राथमिक आरोग्य केंद्रावर आला होता. लसीकरण केंद्रावर अजून लस आलेली नसताना नारकर याने “तुम्ही आमची पहिल्यांदा नावे घ्या. आम्हाला पहिल्यांदा लस घ्यायची आहे” असे म्हणत हुज्जत घातली. त्यावेळी लस येताच आम्ही प्राधान्याने ४५ वर्षावरील लोकांना लस देणार आहे” असे जमादार यांनी सांगितले. दरम्यान फिर्यादी जमादार लसीबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ. शिरोलीकर यांच्याकडून फोनवरुन माहिती घेत होत्या. त्यावेळी फिर्यादी जमादार फोनवरुन नंबर लाऊन घेत असल्याचा गैरसमज करुन घेऊन नारकर याने जमादार यांच्या शासकीय कामात अटकाव केला. त्यांना शिवीगाळ करुन तुम्हाला दाखवतो, बघुन घेतो, अशी धमकी देवुन निघुन गेला. यानंतर नारकर याने फिर्यादीच्या नावासह व्हॉटसअपवरुन लोकांच्यात फिर्यादीबद्दल गैरसमज करुन बदनामी केली. त्यामुळे फिर्यादी जमादार यांनी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास स. पो. नि. सुर्वे, पो. हे. कॉ. चव्हाण हे करीत आहेत.