राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणात कोल्हापूर, भंडारा आघाडीवर, आरोग्यमंत्र्यांचा राज्यातील जिल्हाधिकारी, आरोग्य अधिकाऱ्यांची संवाद
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोना प्रतिबंधक लसीकरणात राज्यात कोल्हापूर जिल्हा अव्वल ठरला आहे. दुसऱया क्रमांकावर भंडारा जिल्हा आहे. सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील जिल्हाधिकारी, आरोग्य अधिकाऱयांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे गुरूवारी संवाद साधला. बैठकीत आरोग्यमंत्र्यांनी कोल्हापूर आणि भंडारा जिल्ह्याचे लसीकरणातील काम कौतुकास्पद असल्याचे स्पष्ट केले.
कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी 38 हजार 325 आरोग्यसेवकांचे कोरोना प्रतिबंधक लस पहिल्या डोसचे उद्दिष्ट 100 टक्के पुर्ण झाले. आजपर्यत 37 हजार 938 पंटलाईन वर्कर्सनी लस घेतली आहे. ही टक्केवारी 127 इतकी आहे. जिल्ह्यात 2 लाख 37 हजार 16 व्याधीग्रस्तांनी तर 3 लाख 17 हजार 803 ज्येष्ठांनी लस घेतली आहे. आजपर्यत 6 लाख 31 हजार 82 जणांनी लस घेतली आहे. जिल्ह्याने 16 लाख लसीकरणाचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. आजपयंत 10 लाखांवर लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य झाले आहे.
जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे आतापर्यत चार टप्पे झाले आहेत. लसीकरणाचा चौथा टप्पा सुरू आहे. त्यामध्ये रविवारपासून बुधवारपर्यत लसोत्सव मोहीम राबवण्यात आली. त्याला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. पण लसीचा होणारा तुटवडा त्यात अडथळा ठरत आहे. तरीही जिल्ह्याने राज्यात लसीकरणात अव्वल स्थान पटकावले आहे. गुरूवारी दुपारी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील कोरोना लसीकरणाचा आढावा घेतला. कोल्हापूर, भंडारा जिल्हा राज्यात अव्वल असल्याचे स्पष्ट करत त्यांनी जिल्हा आरोग्य यंत्रणेचे कौतुक केले. जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, लसीकरण अधिकारी आणि त्यांच्या स्टाफला प्रोत्साहीत करत लसीकरण पूर्ण करा, अशी सुचना त्यांनी केल्याची माहिती आरोग्य विभागातून देण्यात आली.