जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिपादन
वृत्तसंस्था/ जीनिव्हा
जागतिक आरोग्य संघटनेनुसार (डब्ल्यूएचओ) कोरोना महामारीच्या दरम्यान आतापर्यंत 200 कोटी लसीचे डोस वितरित करण्यात आले आहेत. सर्वाधिक 60 टक्के लसींचा वापर भारत, चीन आणि अमेरिकेत झाला आहे. हा आकडा आमच्या अपेक्षेनुरुप आहे. संघटनेने कोवॅक्स मोहिमेच्या अंतर्गत 127 देशांना 8 कोटी लसीचे डोस पोहोचविले आहेत. भारत, अमेरिका आणि चीनला 200 कोटींपैकी मिळालेले 60 टक्के डोस त्यांच्या देशातच तयार करण्यात आले आणि वितरित केले गेल्याचे उद्गार डब्ल्यूएचओ महासचिव टेड्रोस अदनोम घेबरेसस यांचे वरिष्ठ सल्लागार ब्रूस एल्वार्ड यांनी काढले आहेत.
जगभरातील गरीब देशांमध्ये आतापर्यंत 0.5 टक्के लसीच पोहोचल्या आहेत. या देशांमध्ये एकूण 10 लोकसंख्या आहे. भारतातील सीरम इन्स्टीटय़ूट ही लसउत्पादनाची जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. भारतात दुसरी लाट उद्भवल्याने तेथून होणारा पुरवठा प्रभावित झाल्याचे ब्रूस यांनी म्हटले आहे.
अमेरिका देणार कोटय़वधी डोस
अमेरिकेच्या खासदारांनी अध्यक्ष जो बायडेन यांच्या लस वितरण धोरणाची प्रशंसा केली आहे. अमेरिका 8 कोटी डोस देणार आहे. यातील पहिली खेप अडीच कोटी डोस आताच दिले जात आहेत. लस प्राप्त करणाऱया देशांमध्ये भारताचा समावेश आहे. जूनच्या अखेरपर्यंत 8 कोटी डोस देण्यात येणार आहेत.
शांतिसैनिकांचे लसीकरण
भारताने कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतरच संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतिसैनिकांसाठी दोन लाख लसीचे डोस मोफत पाठविले होते. सर्व शांतिसैनिकांना भारताकडून पाठविण्यात आलेली लस देण्यात आल्याची माहिती संयुक्त राष्ट्रसंघाचे प्रमुख अँटोनियो गुतेरेस यांच्या प्रवक्त्याने दिली आहे.