काही राज्यांमध्ये लसींचा पुरेसा साठा अनुपलब्ध : 18 ते 45 वयोगटासाठीच्या मोहिमेत अडचणी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात 1 मेपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या पुढच्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. मात्र, अनेक राज्यांमध्ये लसींचा तुटवडा जाणवत असल्याने या मोहिमेला गती मिळण्याबाबत अंधुकता निर्माण झाली आहे. 18 ते 45 वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरणापूर्वी ऑनलाईन नोंदणी करणे अत्यावश्यक आहे. मात्र, ऑनलाईन नोंदणी करण्यातही अडचणी येत आहेत. काही राज्यांमध्ये पुरेशा लस साठय़ाअभावी तर काही ठिकाणी ऑनलाईन प्रक्रियेतील अडचणींमुळे 1 मे पासून व्यापक होणाऱया मोहिमेत अडचणींचा सामना करावा लागत आहे.
जानेवारीपासून सुरू झालेली लसीकरण मोहीम गती पकडत असतानाच काही राज्यांमध्ये पुरेशा प्रमाणात लसींचा साठा उपलब्ध होत नसल्यामुळे मोहीम संथ गतीने सुरू आहे. लसीकरणासाठी लोकांची गर्दी होत असली तरी अत्यावश्यक साठा नसल्यामुळे काहींना माघारी परतावे लागत आहे. दिल्ली सरकारने लसींचा तुटवडा असल्याची माहिती दिली आहे. दिल्ली सरकारसोबतच ओडिशा आणि जम्मू-काश्मीर सरकारनेही 1 मे पासून लसीकरणाला सुरुवात करण्यास असमर्थता दर्शवली आहे. तसेच महाराष्ट्र आणि राजस्थान या राज्यांनीही लसी उपलब्ध नसल्याने 1 मे पासून लसीकरण सुरू करता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनीही दिल्लीमध्ये सध्या लसी उपलब्ध नसल्याचे म्हटले आहे. दिल्लीमध्ये सध्या लसी उपलब्ध नाहीत. आम्ही कंपन्यांकडे आणि केंद्र सरकारकडे लसींची मागणी केली आहे. जेव्हा त्या उपलब्ध होतील तेव्हा पुढील माहिती दिली जाईल, असे दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी स्पष्ट केले आहे. गेल्या दीड महिन्यात रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण वेगाने वाढत आहे. मात्र गेल्या तीन दिवसात या प्रमाणात घट झाली आहे ही एक आशादायी बाब असल्याचेही त्यांनी पुढे स्पष्ट केले.
ओडिशा सरकारही 1 मेपासून लसीकरण सुरू करणार नसल्याचे समोर येत आहे. राज्यात लसींचा पुरवठा उशिरा होणार असल्याने 1 मेपासून लसीकरणाला सुरुवात करणे अशक्मय असल्याची स्पष्टोक्ती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. सध्या 12 जिह्यातील लसीकरण बंद पडले आहे. त्याचबरोबर जम्मू-काश्मीरमध्येही लसींची मागणी केली असून त्यांना अद्याप पुरवठा झालेला नाही. 20 मेपर्यंत तिथे लस पोहोचणार असल्याचा अंदाज आहे. त्यानंतरच लसीकरणाची सुरुवात होऊ शकते, अशी माहिती प्रशासकीय पातळीवरून देण्यात आली.