मोहिमेसंबंधी राज्यांना ‘व्हर्च्युअल’ माहिती देणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोरोना लसीकरणाच्या तयारीविषयी संवाद साधणार आहेत. या बैठकीत पंतप्रधान लसीकरण मोहिमेची इत्यंभूत माहिती देतील. सोमवारी सायंकाळी चार वाजता पंतप्रधानांची मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक सुरू होणार आहे. या बैठकीत अनेक राज्यांचे मुख्यमंत्री पंतप्रधान मोदींकडे कोरोनाची मोफत लस देण्याचा मुद्दा उपस्थित करू शकतात. या चर्चेत पंतप्रधान कोरोना प्रतिबंधक लसीच्या किंमतीविषयी भाष्य करणार काय? याकडे देशवासियांचे लक्ष लागलेले आहे.
कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन कोरोना प्रतिबंधक लसींना अंतिम मंजुरी दिल्यानंतर देशात कोरोना लसीकरणाची तयारी युद्धपातळीवर सुरू झाली आहे. ठिकठिकाणी लसीकरणासाठी रंगीत तालीम यशस्वी झाल्यानंतर आता शनिवारपासून प्रत्यक्ष लसीकरण होणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना काही महत्त्वपूर्ण दिशानिर्देश देणार आहेत.
लसीकरण मोहिमेसाठी आवश्यक वैद्यकीय यंत्रणा सज्ज करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. सरावसत्राद्वारे उघड झालेल्या वैद्यकीय यंत्रणेतील त्रुटी आणि समस्या दूर करण्यावर भर दिला जात आहे. तसेच आता लसींच्या वितरणावर भर दिला जात आहे. वेगवेगळय़ा राज्यांमध्ये लसींचा पुरवठा करण्यासाठी सरकारच्या देखरेखीखाली वितरण सुरू करण्यात आले आहे. या देशव्यापी मोहिमेमध्ये कोणत्याही ठिकाणी गैरव्यवहार किंवा गोंधळ उडू नये यासाठी सरकारकडून व्यापक यंत्रणा राबविण्यात आली आहे.
पहिल्या टप्प्यात मोफत लस
पहिल्या टप्प्यातील लसीकरण पूर्णपणे विनामूल्य असणार आहे. पुढील टप्प्यांबाबत सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही. पहिल्या टप्प्यात, आरोग्य आणि सुरक्षा कर्मचाऱयांसह केवळ उच्च प्राथमिकता असलेल्यांनाच लस दिली जाणार आहे. याशिवाय वृद्ध लोकांनाही पहिल्या टप्प्यात लस दिली जाईल. सर्व राज्य सरकार सध्या अशा लोकांची यादी तयार करत आहेत.
मोफत लसीकरणाची ममता बॅनर्जींची घोषणा
‘पीएम-सीएम संवादा’पूर्वीच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रविवारी राज्यात मोफत लसीची घोषणा केली आहे. तृणमूल काँग्रेसचे सरकार राज्यातील सर्व लोकांना मोफत कोरोना लस देण्यासाठी योजना तयार करीत आहे, असे ममता बॅनर्जी यांनी जाहीर केले आहे. राज्यात लवकरच विधानसभा निवडणुका होत असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आधीच याची घोषणा केली आहे. यापूर्वी बिहारसह काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी मोफत लस देण्याची घोषणा केली आहे.
बिहारनंतर पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीतही मते मिळविण्यासाठी कोरोना लसीचा एक मोठे शस्त्र म्हणून वापर होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. राजकीय चढाओढीमुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठकीपूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यात प्रत्येकाला मोफत लस देण्याची तयारी चालवली आहे. यावर भाजपने त्यांच्यावर टीका केली. ममता बॅनर्जी या केंद्र सरकारच्या कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे भाजपने म्हटले आहे.