सोनिया गांधी यांच्याकडून काँग्रेस नेत्यांना सूचना
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
राजस्थान आणि पंजाबमधील राजकीय संकटादरम्यान काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गुरुवारी पक्षाचे सर्व महासचिव, प्रदेश प्रभारी आणि प्रदेशाध्यक्षांसोबत व्हर्च्युअल बैठक घेतली आहे. यादरम्यान त्यांनी केंद्र सरकारच्या कोविड व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित करत काँग्रेसने पूर्ण लसीकरण निश्चित करण्यात सक्रीय भूमिका बजवावी असे म्हटले आहे.
सरकारने काँग्रेसच्या आग्रहामुळे अखेर लसीकरणाची जबाबदारी स्वीकारली आहे. सर्व लोकांचे लसीकरण व्हावे आणि डोस वाया जाऊ नयेत हे सुनिश्चित करावे लागणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तज्ञ आता काही महिन्यांनी संभाव्य तिसऱया लाटेबद्दल बोलत आहेत, यावरही त्वरित लक्ष देण्याची आवश्यकता आहे. लोकांना या संकटापासून वाचविण्यासाठी अधिक चांगल्या पद्धतीने तिसऱया लाटेला तोंड देण्यासाठी पावले उचलण्याची गरज असल्याचे सोनियांनी म्हटले आहे. इंधनाच्या वाढत्या दरांमुळे पडलेल्या असहय़ भाराची सर्वांनाच कल्पना आहे. शेतकरी आणि लाखो कुटुंबांना याचा फटका बसत आहे. वाढत्या दरांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले आहे. इंधनासह डाळी आणि खाद्यतेलांच्या किमती गगनाला भिडत असल्याचे त्या म्हणाल्या.