प्रतिनिधी/ सातारा
शाहूपुरी ग्रामविकास आघाडीच्या वतीने मार्फत तामजाईनगर मधील पोतदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये शुक्रवारी लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र येथील रहिवाशांऐवजी बाहेरील नागरिक लस घेत असल्याने गोंधळ निर्माण झाला. यावेळी पोलीसांना बोलवण्यात आल्याची माहिती येथील डॉक्टरांनी दिली.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी तामजाईनगरमध्ये शाहूपुरी ग्रामविकास आघाडीच्या यांच्यामार्फत लसीकरण ठेवण्यात आले. हे लसीकरण होणार असल्याची माहिती दोन दिवसापूर्वीच सर्वांना मिळाली. मात्र हे लसीकरण तामजाईनगर येथील रहिवाशांसाठी होते. लसीकरणाच्या दिवशी पहाटे पासून स्थानिक रहिवाशांपेक्षा बाहेरील नागरिकांनी रांगा लावल्या. फक्त 300 डोस शिल्लक होते. सकाळी 9 वाजता लसीकरणाला सुरूवात झाली. यामुळे बाहेरील नागरिकांनी लस घेतली. स्थानिक रहिवाशांना रांगा लावूनही लस मिळाली नाही. रांगेत बाहेरील नागरिक असल्याचे लक्षात आल्याने नागरिकांच्यात वादावादी सुरू झाली. हा वाद विकोपाला जाऊ नये म्हणून येथील डॉक्टरांनी पोलीसांना यांची माहिती दिली. पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्यानंतर वाद निवळला आणि नागरिकांनी रांगेत उभे राहून लस घेतली.