आरोग्य केंद्रांमध्ये लस मर्यादित प्रमाणात उपलब्ध – नागरिकांची संख्या मात्र अधिक
प्रतिनिधी/ बेळगाव
सर्वसामान्यांना लस उपलब्ध होण्यामध्ये आजही समस्या कायम आहे. अद्याप अनेक नागरिकांना पहिला डोस मिळाला नाही. ज्यांनी पहिला डोस घेतला त्यांना दुसरा डोस मिळण्यात अडचणी येत आहेत. लस मिळविण्यासाठी नागरिक सर्वत्र पायपीट करत असून अनगोळ येथे शनिवारी लस देण्यात येत असल्याचे समजताच नागरिकांनी प्रचंड प्रमाणात गर्दी केली.
आरोग्य केंद्रांमध्ये लस मर्यादित प्रमाणात उपलब्ध होत आहेत. साधारण 100 ते 150 इतकेच डोस येतात. परंतु उपलब्ध प्रमाणात नागरिकांची संख्या मात्र तिपटीने अधिक असते. शनिवारी हेच चित्र अनगोळ आरोग्य केंद्रात पाहायला मिळाले. तेथे पहाटेपासूनच नागरिकांच्या रांगा लागल्या.
उपलब्ध लस आणि उपस्थित नागरिक यांच्यातील विसंगती लक्षात येताच वादावादीला प्रारंभ झाला. त्यामुळे या ठिकाणी पोलिसांना पाचारण करावे लागले. लस मिळण्यातील अडचणी नागरिकांना त्रासदायक ठरत असून त्यावर आरोग्य खाते आणि प्रशासनाचे नियंत्रण राहिले नाही. साधारण सर्वच ठिकाणी लसीसाठी वाद होत आहेत. त्यामुळे लस वितरण करण्यामध्ये सुसूत्रता आणावी व त्याचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी होत आहे.