मुंबई \ ऑनलाईन टीम
राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी 18 मे रोजी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. आरोग्य मंत्र्यांनी ट्विट करत याची माहिती दिली होती. त्यानंतर राजेश टोपे यांना 30 दिवसांनंतर लसीचा दुसरा डोस कसा मिळाला, असा प्रश्न अनेकांकडून विचारण्यात येत होता. सोशल मीडियावर त्यांच्यावर टीका देखील झाली. या टीकेचे स्वत: आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिल आहे.
राजेश टोपे यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, मी ‘कोवॅक्सिन’ लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार 30 व्या दिवशी दुसरा डोस घेतला. दोन डोसमध्ये सुमारे 8० दिवसांचे अंतर ठेवण्याचा नवा नियम ‘कोविशिल्ड’ लसीसाठी आहे. ‘सुज्ञांस अधिक सांगणे न लगे’….अशा शब्दात त्यांनी टीकाकारांना उत्तर दिले आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या गाईडलाईन नुसार कोविन पोर्टलवर लसीकरणासाठी देशभरात नोंदणी करण्यात येत आहे. त्यानुसार लसीकरणाची वेळ नागरिकांना देण्यात येते. राज्यात नागरिकांना कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसींचे दोन डोस देण्यात येत आहेत. नोंदणी केल्यानंतरच लसीकरणासाठी वेळ ठरवून दिली जाते. कोव्हिशिल्डच्या पहिल्या डोस नंतर नविन गाईडलाईननुसार 80 दिवसांनी आता दुसरा डोस मिळणार आहे. तर कोव्हॅक्सिन लसीच्या कालावधीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. कोव्हॅक्सिनच्या पहिल्या डोस नंतर ३० दिवसांनी दुसरा डोस घेता येतो.