अजून काही आठवडे प्रक्रिया सुरू राहणार : व्ही. के. पॉल
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतात मागील महिन्यात आयसीएमआर आणि भारत बायोटेक कंपनी बनवत असलेल्या कोवॅक्सिन लसीच्या प्राथमिक टप्प्यातल्या मानवी चाचण्यांना सुरुवात झाली आहे. या चाचण्या घेण्याची प्रक्रिया सुरू असून आणखी काही आठवडे ही प्रक्रिया सुरू राहणार असल्याची माहिती कोविड-19 राष्ट्रीय कृती दलाचे प्रमुख व्ही. के. पॉल यांनी बुधवारी दिली.
जगभरात फोफावलेल्या कोरोना विषाणू संसर्गावर प्रभावी लस शोधण्यासाठी भारतासह अनेक देशांचे प्रयत्न सुरू आहेत. लसीच्या शोधासाठी वैज्ञानिक दिवसरात्र मेहनत घेऊन कोरोनावरील लस विकसित करत आहेत. भारतातील 12 शहरांमध्ये लसीच्या मानवी चाचण्या सुरू झाल्या असून त्यामधील सर्व अहवाल सकारात्मक आले आहेत. कोरोना रोगाविरुद्धच्या लसीच्या चाचण्या स्वयंसेवकांवर घेतल्या जात आहेत. सध्याच्या मानवी चाचण्यांच्या प्रारंभीच्या निकालांसाठी भारताला काही आठवडय़ांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. पहिले दोन्ही टप्पे पार पडल्यानंतर तिसऱया टप्प्यात अधिक प्रगत चाचण्या घेतल्या जाणार आहेत.
स्वयंसेवकांच्या रक्ताच्या नमुन्यांच्या मदतीने लसीच्या रोगप्रतिकारक शक्तीचा अभ्यास केल्यानंतर लसीचा पुढील डोस दिला जाणार आहे. आता ही लस दुसऱया टप्प्यात किती प्रभावशाली ठरते हे पाहिले जात आहे. त्यानंतर पुढील प्रक्रिया निश्चित करून नियामक मंडळाकडून परवानगी मागितली जाईल, असे पॉल यांनी स्पष्ट केले.
सिरमकडूनही हालचाली वेगवान
ब्रिटनस्थित ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने विकसित केलेल्या लसीची चाचणीही भारतात केली जाणार आहे. पुण्यातील सिरम इन्स्टिटय़ूटने उत्पादनासाठी एस्ट्राजेनेका या कंपनीसोबत भागिदारी केली आहे. या लसीला त्यांनी कोविशिल्ड हे नाव दिले आहे. सिरमने भारतासह कमी राष्ट्रीय उत्पन्न असलेल्या 92 देशांमध्ये ही लस उपलब्ध करून देणार असल्याचे सिरम इन्स्टिटय़ूटने यापूर्वीच जाहीर केले आहे.