ऑनलाईन टीम / लंडन :
ब्रिटन सरकारने फायझर आणि बायोएनटेकच्या कोरोना लसीच्या वापराला मंजुरी दिली आहे. लसीकरण सुरू होण्यापूर्वीच ब्रिटनने महत्वाची घोषणा केली आहे. या लसीचे दुष्परिणाम झाल्यास सरकार नागरिकांना नुकसान भरपाई देणार आहे.
फायझर-बायोएनटेकची लस कोरोनावर 95 टक्के प्रभावी आहे. ही लस व्यापक वापरासाठी योग्य असल्याचे ब्रिटिश नियामक MHRA ने म्हटले आहे. ज्या लोकांना सर्वाधिक गरज आहे, त्यांना प्राधान्याने ही लस देण्यात येणार आहे.
अमेरिकन कंपनी फायझर आणि जर्मन कंपनी बायोएनटेककडून ब्रिटनने लसीचे 4 कोटी डोस मागवले आहेत. 2 कोटी नागरिकांना ही लस देण्यात येणार आहे. 21 दिवसांच्या काळात प्रत्येक व्यक्तीला या लसीचे दोन डोस देण्यात येणार आहेत. तर काही दिवसातच बेल्जियमहून कोरोना लसीचा पहिला लॉट ब्रिटनला मिळणार आहे. त्यामुळे 15 डिसेंबरपासून नागरिकांना लस देण्याचे काम सुरू होऊ शकते, असे ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हॅनकॉक यांनी म्हटले आहे.