ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या संशोधकांकडून लस विकसित : जगभरात 25 लाख 74 हजार 994 कोरोनाबाधित
कोरोना विषाणूचा संसर्ग जगभरात आतापर्यंत 25 लाख 74 हजार 994 जणांना झाला आहे. तर 1 लाख 78 हजार 658 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 7 लाख 04 हजार 049 जणांनी कोरोनाच्या संसर्गावर मात केली आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठाचे संशोधक गुरुवारपासून केरोनावरील लसीच्या माणसांवरील चाचणीस प्रारंभ करणार आहेत. लसीकरता कुठल्याही प्रकारचा त्याग करण्यास तयार असल्याचे उद्गार ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हॅनकॉक यांनी काढले आहेत. ब्रिटन सरकार इंपीरियल कॉलेजला लसविषयक संशोधनासाठी 22.5 दशलक्ष पौंडचा (201 कोटी रुपये) निधी पुरविणार आहे. ब्रिटनमध्ये आतापर्यंत 17 हजारांपेक्षा अधिक जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.
हॉकिंग यांचे व्हेंटिलेटर दान
जगप्रसिद्ध वैज्ञानिक स्टीफन हॉकिंग यांच्यासाठी वापरण्यात आलेले व्हेंटिलेटर ब्रिटनच्या कॅम्ब्रिज शहरातील रॉयल पापवर्थ रुग्णालयाला देण्यात आले आहे. स्टीफन यांचे 2018 साली निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर सर्व वैद्यकीय उपकरणे परत केली होती. परंतु काही सामग्री स्टीफन यांनी खरेदी केली होती, अशी माहिती त्यांची कन्या लूसी हॉकिंग यांनी दिली आहे.
दुष्काळसदृश समस्या उभी राहणार
महामारीमुळे अनेक देशांमध्ये अन्नसंकट निर्माण होण्याचा धोका आहे. 30 हून अधिक देशांमध्ये अन्नसंकट रोखण्यासाठी तत्काळ पावले उचलली जावीत. सुमारे 26.5 कोटी लोक उपासमारीत सापडतील. संघर्ष, आर्थिक संकट आणि हवामान बदलामुळे प्रभावित 10 देशांना सर्वाधिक धोका असल्याचे उद्गार जागतिक अन्न कार्यक्रमाचे प्रमुख डेव्हिड बेस्ले यांनी काढले आहेत.
अमेरिका : दुसरी लाट अधिक विध्वंसक
अमेरिकेत 24 तासांमध्ये 2,804 जणांचा मृत्यू झाला असून 25,985 नवे रुग्ण सापडले आहेत. एकूण बळींचा आकडा 45,343 झाला आहे. कोरोनाची दुसरी लाट अधिक विध्वंसक असेल. देशाला फ्ल्यू तसेच कोरोना या दोन्ही महामारींना एकाचवेळी तोंड द्यावे लागणार आहे. हिवाळय़ात या महामारीला पुन्हा तोंड द्यावे लागण्याची पूर्ण शक्यता असल्याचा इशारा डिजिज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनचे संचालक रॉबर्ट रेडफिल्ड यांनी दिला आहे.
स्पेन : टाळेबंदी होणार शिथिल
15 मेनंतर स्पेनमधील टाळेबंदी शिथिल केली जाणार आहे. सुरक्षेचा विचार करून निर्बंध कालबद्धरित्या मागे घेतले जाणार असल्याची माहिती पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनी संसदीय अधिवेशनात दिली आहे. स्पेनमध्ये सद्यकाळात कुठल्याही कारणास्तव मुलांना घराबाहेर पडण्याची अनुमती नव्हती. परंतु सरकारने लहान मुलं-मुली स्वतःच्या आईवडिलांसोबत घराबाहेर पडू शकत असल्याचे सांगितले आहे.
कॅनडात एकूण 1834 बळी
कॅनडात मंगळवारी 1 हजार नवे रुग्ण सापडले आहेत. तर एकूण रुग्णांची संख्या 38,422 झाली आहे. देशात कोरोनामुळे आतापर्यंत 1,834 जणांना जीव गमवावा लागला आहे. क्यूबेक (20,126 रुग्ण) ओंटारियो (11,735 रुग्ण) प्रांतामध्ये सर्वाधिक संसर्ग दिसून आला आहे. कॅनडाने उपाययोजनांना प्रारंभ केल्याने कोरोनावर काही प्रमाणात नियंत्रण मिळविण्यास यश आले आहे.
दक्षिण आफ्रिकेत मदतनिधी जाहीर
दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरिल रामफोसा यांनी 26 अब्ज डॉलर्सच्या मदतनिधीची घोषणा केली आहे. ही रक्कम देशाच्या जीडीपीच्या 10 टक्के इतकी आहे. या निधीद्वारे संकटाला सामोरे जाणाऱया नागरिकांना मदत तसेच अर्थव्यवस्थेची स्थिती सुधारली जाणार आहे. दक्षिण आफ्रिकेत 27 मार्चपासून टाळेबंदी लागू करण्यात आली आहे.
टाळेबंदीच्या नियमांनुसार अंत्यसंस्कार वगळता अन्य सार्वजनिक सोहळय़ांवर बंदी घालण्यात आली आहे. अंत्यसंस्कारात 100 पेक्षा अधिक लोकांना सामील होण्यास मज्जाव आहे.
जपान : क्रूजवर 33 बाधित
जपानच्या नागासाकी किनाऱयावर दुरुस्तीसाठी थांबलेल्या इटलीच्या क्रूजवर 33 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. जपानमध्ये 24 तासांमध्ये 18 जणांचा मृत्यू झाला असून 377 रुग्ण सापडले आहेत. जपानच्या एका शिशू देखभाल केंद्रात 8 मुलांना लागण झाल्याचे समोर आले आहे. गोल्डन वीक राष्ट्रीय सुटीमुळे विषाणूचा अधिक फैलाव होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
दक्षिण कोरियात 11 नवे रुग्ण
दक्षिण कोरियात 24 तासांच्या कालावधीत 11 नवे रुग्ण सापडले आहेत. देशातील एकूण रुग्णांची संख्या वाढून 10,694 झाली आहे. तर एकूण बळींचा आकडा 238 झाला आहे. देशात मागील 5 दिवसांपासून नव्या रुग्णांचा आकडा 20 पेक्षा कमी राहिला आहे. कोरोना संसर्गामुळे मंगळवारी एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती तेथील आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. दक्षिण कोरियातील उपाययोजना अधिक यशस्वी ठरल्या आहेत.
चीनमध्ये 30 नवे बाधित
चीनमध्ये मंगळवारी 30 नवे कोरोनाबाधित सापडले असून यातील 23 रुग्ण विदेशातून दाखल झाले आहेत. तसेच मंगळवारी एकही बळी गेला नसल्याचे सांगण्यात आले. अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी शांक्सी प्रांतातील चिनमी गावाला भेट दिली आहे. या गावातील गरिबी उर्न्मूलन तसेच औद्योगिक विकासाची माहिती जिनपिंग यांनी जाणून घेतली आहे.
इटली : टाळेबंदी शिथिल होणार
इटलीत पहिल्यांदाच कोरोना विषाणू संसर्गात मोठी घट दिसून आली आहे. 4 मेपासून टाळेबंदीत सूट देण्याची घोषणा लवकरच करणार असल्याचे पंतप्रधान ग्यूसेफ कोंटे यांनी म्हटले आहे. इटलीत आतापर्यंत 1 लाख 83 हजार 957 रुग्ण सापडले आहेत. तर मंगळवारी 534 जणांना जीव गमवावा लागला असून 2729 नवे रुग्ण सापडले आहेत.
सौदीतील निर्बंध शिथिल?
सौदी अरेबिया सरकार रमझानमुळे टाळेबंदीत काही प्रमाणात शिथिलता आणण्याचा विचार करत आहे. सरकारने सोमवारी रात्री पवित्र स्थळ मक्का तसेच मदिनामध्ये नमाजसाठी दिलासा दिला आहे. सौदी अरेबियात आतापर्यंत 11 हजार 631 रुग्ण सापडले असून 109 जणांचा मृत्यू झाला आहे.