जागतिक आरोग्य संघटनेचे आवाहन : सर्वांना लस मिळेपर्यंत खबरदारी आवश्यक : आरोग्य यंत्रणा सुधारली जावी
कोरोना विषाणूवरील लस मिळण्याची प्रतीक्षा करत बसू नका. कोविड-19 संबंधी स्वतःची प्रतिसाद यंत्रणा सुधारण्यावर देशांनी लक्ष केंद्रीत करावे. लसीवर अधिक प्रमाणात निर्भर राहू नका, प्रारंभिक काळात अधिक मागणी असल्याने त्याचा पुरेसा पुरवठा होऊ शकणार नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या आशिया-प्रशांत क्षेत्राचे संचालक ताकेशी कसई यांनी म्हटले आहे. जोपर्यंत सर्व देश सुरक्षित होत नाहीत तोपर्यंत कुठलाच देश सुरक्षित नाही. आरोग्य आणि उपचारव्यवस्था सुधारण्यावर भर दिला जाणे आवश्यक असल्याचे ताकेशी यांनी पत्रकार परिषदेत नमूद पेले आहे.
रशियन लस प्राप्त करणार
मॉस्कोमध्ये भारतीय दूतावास सातत्याने रशियन आरोग्य अधिकाऱयांच्या संपर्कात आहे. स्पुतनिक-5 लस तयार करणाऱया गामलेया रिसर्च इन्स्टीटय़ूटशी दूतावासाचे अधिकारी बोलणी करत आहेत. मागील आठवडय़ातच या लसीच्या वापराला हिरवा झेंडा दाखविण्यात आला आहे. भारतीय दूतावास या लसीची सुरक्षितता आणि प्रभावाचा तपशील प्राप्त करू पाहत आहे. पाश्चिमात्य देशांनी या लसीबद्दल संशय व्यक्त केला आहे. तर रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा केला आहे.
चाचणीचा दुसरा टप्पा
सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया चालू आठवडय़ात ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ऍस्ट्राजेनेका यांनी तयार केलेल्या लसीची चाचणी सुरू करणार आहे. कोविशील्ड नावाच्या या लसीसाठी सीरम इन्स्टिटय़ूट आणि ऍस्ट्राजेनेका यांच्यात करार झाला आहे. देशभरातील 10 केंद्रांवर लसीची दुसऱया तसेच तिसऱया टप्प्यातील चाचणी होणार आहे. सीरम इन्स्टिटय़ूटने 100 कोटी डोस तयार करण्याची सहमती दिली आहे.
कोव्हॅक्सिन ‘सुरक्षित’
भारत बायोटेक आणि आयसीएमआरने मिळून तयार केलेल्या लसीच्या पहिल्या टप्प्यातील चाचणीचे निष्कर्ष समोर आले आहेत. लस चाचण्यांमध्ये सुरक्षित आढळून आली आहे. कुठल्याही स्वयंसेवकांमध्ये लसीचे दुष्परिणाम दिसून आलेले नाहीत. पुढील टप्प्यात लसीचा प्रभाव पडताळून पाहिला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 12 ठिकाणी 375 स्वयंसेवकांवर चाचणी झाली होती.
चीन-रशिया एकत्र
चीनने रशियाच्या संशोधकांना कोरोनावरील लसीच्या चाचणीचे निमंत्रण दिले आहे. चीनचे आघाडीचे तज्ञ झोंग नानशन यांनी ही कल्पना मांडली आहे. कुठल्या लसीच्या संयुक्त चाचणीचा प्रस्ताव मांडला हे मात्र त्यांनी स्पष्ट केलेले नाही. रशियाने मागील आठवडय़ातच लसीला मंजुरी दिली आहे. तर चीननेही कॅनसिनोच्या लसीला पेटंट दिले आहे. चीन अजून 6 लसी विकसित करत असून त्या मानवी चाचण्यांना सामोऱया जात आहेत. दोन्ही देशांमधील प्रक्रियेबद्दल अन्य देशांच्या तज्ञांनी संशय व्यक्त केला आहे.
20 ते 40 वयोगटातही फैलावतोय संसर्ग
जगभरात कोरोना विषाणूची बाधा आतापर्यंत 2 कोटी 20 लाख 77 हजार 830 जणांना झाली आहे. यातील 1,48,13,751 बाधितांना संसर्गापासून मुक्ती मिळाली आहे. जगभरात 20 ते 40 या वयोगटातील लोकही संक्रमित होत आहे. यातील अनेकांना संसर्ग झाल्याचे माहित नाही. पूर्वी नियंत्रण मिळविलेल्या देशांमध्ये आता संसर्ग फैलावत आहे. अनेक देशांना पुन्हा टाळेबंदी लागू करावी लागली आहे. आशिया-प्रशांत क्षेत्रात हा आजार आता पुढील टप्प्यात पोहोचल्याचे उद्गार जागतिक आरोग्य संघटनेचे क्षेत्र संचालक ताकेशी कसई यांनी काढले आहेत.
न्यूझीलंडला केले लक्ष्य
न्यूझीलंडमध्ये पुन्हा संसर्ग फैलावला असून 9 नवे रुग्ण सापडले आहेत. न्यूझीलंडचे प्रशासन संसर्ग रोखल्याचे दाखवून देऊ पाहात होते, परंतु आता तेथे वेगाने रुग्ण वाढत आहेत असे म्हणत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निशाणा साधला आहे. देशातील रुग्णसंख्येची तुलना अमेरिकेशी केली जाऊ शकत नसल्याचे आर्डर्न यांनी म्हटले आहे.
स्पेन : निर्बंध लागू
स्पेन 4 नव्या भागांमध्ये सोमवारी निर्बंध लागू केले आहेत. यात एंडालुसिया, गॅलिसिया, कँटाब्रिया आणि कॅस्टिला यांचा समावेश आहे. हे चारही भाग देशाचे लोकसंख्येची अधिक घनता असलेले आहेत. स्पेनमध्ये दोन महिन्यांपूर्वी पर्यटकांना येण्याची अनुमती देण्यात आली होती. तेव्हापासून प्रतिदिन 100 पेक्षा अधिक नवे रुग्ण सापडून येत आहेत.
माल्टा : नाइटक्लब बंद
माल्टा सरकारने वाढती रुग्णसंख्या पाहता बार आणि नाइटक्लब पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. नवे नियम बुधवारपासून लागू होणार आहेत. खेळाशी संबंधित ठिकाणे आणि सोशल क्लबमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यावर भर दिला जाणार आहे. एका ठिकाणी 15 पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यावर बंदी असणार आहे. परंतु रेस्टॉरंट आणि दुकाने सुरू राहणार आहेत.
मिठाई कारखान्यात संसर्ग
ब्रिटनमधील मिठाईच्या कारखान्यात काम करणाऱया 72 कर्मचाऱयांना कोरोनाची लागण झाली आहे. या कारखान्यात 1,600 कर्मचारी आहेत. स्थानिक प्रशासन आता कारखान्याच्या व्यवस्थापनासोबत मिळून सर्व कर्मचाऱयांची चाचणी करणार आहे. देशात आतापर्यंत 3 लाख 19 हजार 917 रुग्ण सापडले असून 41 हजारपेक्षा अधिक जणांचा मृत्यू ओढवला आहे.
ओमान : पर्यटकांना मंजुरी
ओमान सरकारने देशात पर्यटकांना येण्याची मंजुरी दिली आहे. याचबरोबर ओमानने हॉटेल्समधील इंटरनॅशनल रेस्टॉरंट, जिम आणि जलतरण तलाव खुले करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व लोकांना उपाययोजनांचे पालन करणे अनिवार्य असणार आहे. देशात आतापर्यंत 83 हजारपेक्षा अधिक बाधित सापडले असून 588 जणांना जीव गमवावा लागला आहे.
विस्फोटानंतरसंसर्ग वाढला
लेबनॉनमध्ये स्फोटानंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. या टाळेबंदीत केवळ वैद्यकीय सेवा सुरू राहणार आहे. राजधानी बैरुत येथील बंदरानजीक 4 ऑगस्ट रोजी विस्फोट झाला होता आणि यात सुमारे 200 जणांचा मृत्यू झाला होता. देशात 456 नवे रुग्ण सापडले आहेत. तेथील रुग्णसंख्या 9,337 झाली आहे.