बाधितांची संख्या वाढत असल्याने लस घेण्यासाठी नागरिक धावपळ
प्रतिनिधी/ बेळगाव
शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने लस घेण्यासाठी नागरिक धावपळ करीत आहेत. पण सध्या लसीचा तुटवडा असल्याने लसीकरणाची मोहीम थंडावली आहे. तसेच खासगी रुग्णालयातील लसीकरण थांबविण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना लस मिळणे मुश्कील बनले आहे. खासगी रुग्णालयातील लसीकरण मोहीम सुरू ठेवण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम मोठय़ा प्रमाणात सुरू करण्यात आली होती. मात्र कोरोनाचा प्रभाव वाढला असून शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढली आहे. तसेच कोरोनामुळे मृत्यू होणाऱयांची संख्या वाढत असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. कोरोना प्रतिबंधक लस घेण्यास प्रारंभी प्रतिसाद मिळाला नाही. पण अलिकडे लसीकरणासाठी नागरिकांचा प्रतिसाद वाढला असून प्राथमिक आरोग्य केंद्रावर गर्दी होत आहे. तसेच सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने लसीकरण मोहीम थंडावली आहे. त्यामुळे नागरिकांना सरकारी आरोग्य केंद्रात लस मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. सरकारी आरोग्य केंद्रात मोफत लस देण्यात येते. पण खासगी रुग्णालयात लस देण्यासाठी शुल्क आकारण्यात येत आहे. त्यामुळे काही नागरिक खासगी रुग्णालयात देखील लस घेत आहेत. पण कोरोनाचा प्रभाव वाढल्यानंतर खासगी रुग्णालयात लस मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय वाढली आहे. सरकारी रुग्णालयात लस मिळत नसल्याने नागरिक खासगी रुग्णालयात लस घेण्यासाठी जात आहेत. पण लस उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सध्या सरकारी आणि खासगी रुग्णालयात लसीकरण मोहीम थंडावली आहे.
लस मिळत नसल्याने गैरसोय
सध्या कोरोना बाधिताची संख्या वाढल्याने नागरिकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. सरकारी रुग्णालयात बेड मिळणे कठीण बनले असून रेमडेसिवीर इंजेक्शनचा आणि ऑक्सिजनच्या तुटवडय़ामुळे कोरोनाबाधित रुग्ण गंभीर बनत आहेत. त्यामुळे प्रत्येकजण लस घेवून सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण लस मिळत नसल्याने गैरसोय होत आहे. गैरसोय टाळण्यासाठी सरकारी रुग्णालय आणि खासगी रुग्णालयात लस उपलब्ध करून नागरिकांना दिलासा देण्यात यावा, अशी मागणी होत आहे.