प्रतिनिधी / बेळगाव
महापालिकेच्या कामगारांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली होती. स्वच्छता कामगारांसह आरोग्य विभागातील बहुतांश कामगारांसह मनपा कार्यालयातील कर्मचाऱयांनी लस घेतली आहे. मात्र, लस घेतल्यानंतरही दोन कामगारांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे महापालिकेच्या कर्मचाऱयांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
महापालिका कार्यालयात पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला असून मुख्य कार्यालयातील डाटा इंट्री ऑपरेटर आणि सामान्य प्रशासन विभागातील कर्मचारी तसेच आरोग्य विभागातील मुकादमाला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे महापालिका कार्यालयातील कर्मचाऱयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱयांना प्रंट वॉरिअर्स म्हणून लस घेण्याची सूचना करण्यात आली होती. पण लसीच्या दुष्परिणामांचा विचार करून लस घेण्यास टाळाटाळ चालविली होती. ताप येणे, चक्कर येणे, रक्ताच्या गुठळय़ा होत असल्याची अफवा पसरली होती. मात्र, आरोग्य अधिकाऱयांनी गैरसमज दूर केल्यानंतर स्वच्छता कर्मचाऱयांनी लस घेण्यास प्रारंभ केला. महापालिका मुख्य कार्यालयातील अधिकाऱयांनी तसेच कामगारांनी लस घेतली आहे. पण लस घेतल्यानंतरही काही कर्मचाऱयांना कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे. काहींनी पहिला डोस घेतला असून दुसरा डोस घेण्याची मुदत चार दिवस असतानाच चार दिवसांपासून ताप येत असल्याचे जाणवू लागले. त्यामुळे सामान्य विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱयांनी कोरोना चाचणी करून घेतली असता कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले. आरोग्य विभागातील डाटा इंन्ट्री ऑपरेटरला तसेच स्वच्छता मुकादमाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
बेंगळूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, पण बेळगाव शहरात हा आकडा स्थिर होता. पण अलीकडे या आकडय़ात वाढ झाली असून मंगळवारी कोरोनाबाधितांचा आकडा 394 पर्यंत गेला आहे. महापालिका कार्यालयातील कामगारांना कोरोनाची लागण झाल्याने कार्यालयात धास्ती निर्माण झाली आहे. महापालिका कार्यालयातच पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाल्याने कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी महापालिका कार्यालयापासून प्रारंभ करण्याची गरज निर्माण झाली आहे. मनपा कार्यालयातील कर्मचाऱयांनी लस घेऊनही कोरोनाची लागण झाल्याने महापालिका कार्यालयामधील कर्मचाऱयांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. दुसरा डोस घ्यावा की नाही, अशी विचारणा होत आहे.