तामिळनाडूतील कोवलम येथे अनोखी ऑफर, मोफत बिर्याणी, मोबाईल रिचार्जचीही सुविधा
तामिळनाडतून मोफत उपहार सरकारी योजना आणि निवडणूक प्रचाराचा भाग राहिले आहेत. पण आता लसीकरणाला चालना देण्यासाठी मोफत भेटवस्तूंची मदत घेतली जात आहे. येथील कोवलममध्ये स्वयंसेवी संस्था लस घेणाऱया लोकांना एक प्लेट बिर्याणी आणि मोबाईल रिचार्जचे कूपन देत आहे. याचबरोबर साप्ताहिक लकी ड्रॉमध्ये बम्पर प्राइजही दिले जात आहे. लकी ड्रॉच्या विजेत्याला सोन्याची नाणी, मिक्सर, ग्राइंडर, स्कुटी, वॉशिंग मशीनही मिळू शकते.
मच्छिमारबहुल कोवलमची लोकसंख्या 14,300 आहे. यात 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे 6400 लोक आहेत. ही योजना लोकांना लस घेण्यासाठी प्रेरित करत आहे. या पुढाकारापूर्वी या भागातील 50-60 लोकांनीच सल घेतली होती. पण योजनेनंतर गावातील लोक उत्साहित असल्याचे संस्थेने म्हटले आहे.
एका आठवडय़ात 650 हून अधिक लोकांनी पहिला डोस घेतला आहे. तसेच 700 हून अधिक लोकांनी आगाऊ नोंदणी केली आहे. लसीबद्दल आमच्या लोकांमध्ये गोंधळ होता. पण स्वयंसेवी संस्थेच्या प्रयत्नांमुळे आम्हाला प्रोत्साहन मिळाले आहे. आम्ही आता पूर्ण कुटुंबासमवेत जात लस घेत आहोत असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
न्यूयॉर्कच्या संस्थेची मदत
कोवलमला कोरोनामुक्त करण्याचा हा पुढाकार एसटीएस फौंडेशन, सीएन रामदास ट्रस्ट आणि न्यूयॉर्कमधील चिराग संस्थेने हाती घेतला आहे. सीएन रामदास ट्रस्टमध्ये डॉन बॉस्को स्कुलच्या 1992 च्या बॅचचे माजी विद्यार्थी आहेत आणि न्यूयॉर्कमधील साथरोगतज्ञ डॉक्टर राजीव फर्नांडो यांनी चिराग संस्थेची स्थापना केली आहे. दोन्ही संस्थांकडून निधी जमविला जातो आणि एसटीएस फौंडेशन प्रत्यक्ष काम करत आहे.
100 लसीकरणाचे लक्ष्य
लोक टोल फ्री क्रमांकावर फोन करून स्वतःचा स्लॉट नोंदवू शकतात. मोफत बिर्याणीचे लोकांमध्ये आकर्ष राहिले आहे. आमच्या लसीकरण केंद्रातील वातावरण अधिक मजेशीर आहे. कोवलमध्ये 100 टक्के प्रौढ लोकसंख्येला लवकरात लवकर लस देण्याचे आणि हे गाव देशात आदर्श ठरावे असा प्रयत्न असल्याचे एसटीएस फौंडेशनचे विश्वस्त जे. सुंदर यांनी म्हटले आहे.