कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लस तयार करू पाहणाऱया एका जर्मन कंपनीवर ट्रम्प प्रशासनाची नजर असल्याचा दावा जर्मनीच्या अधिकाऱयांनी केला आहे. ट्रम्प प्रशासनाने या कंपनीला भरभक्कम रक्कम देण्याचा प्रस्ताव दिला आहे. जर्मनी कंपनीने अमेरिकेत येऊ स्वतःचे संशोधन पार पाडावे असा ट्रम्प प्रशासनाचा प्रयत्न आहे. कुठलीही लस तयार झाल्यास सर्वप्रथम ती अमेरिकेच्या नागरिकांसाठी उपलब्ध व्हावी असा ट्रम्प यांचा प्रयत्न असल्याचा कयास जर्मनीत व्यक्त होत आहे.
व्हाइट हाउसमध्ये दोन मार्च रोजी पार पडलेल्या एका बैठकीत क्योरवॅक या जर्मन कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॅनियल मेनिचेल्ला यांच्यासमोर यासंबंधीचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या बैठकीत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तसेच उपाध्यक्ष माइक पेन्स हे देखील उपस्थित होते.
पेन्स यांच्या नेतृत्वाखाली कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी एक कृतिदल स्थापन करण्यात आले आहे. काही महिन्यांमध्येच एक लस निर्माण करण्यास सक्षम ठरू असे विधान जर्मन कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॅनियल यांनी बैठकीनंतर म्हटले आहे.
डॅनियल हे मूळचे अमेरिकेचे नागरिक असून दोन वर्षांपासून जैवतंत्रज्ञान कंपनी क्योरवॅकचे नेतृत्व करत आहेत. कंपनी किंवा तंत्रज्ञान विकण्यासंबंधीचे दावे फेटाळत असल्याचे क्योरवॅकने म्हटले आहे. ट्रम्प प्रशासनाने लससंबंधी 25 हून अधिक अधिक कंपन्यांशी चर्चा केली आहे.