जगभरात 1 लाख 14 हजार 980 जणांचा मृत्यू
कोरोना विषाणू इन्फ्लूएंजा सारखा हंगामी आजार नाही. या संसगांवर लस तयार होत नाही तोवर याचा प्रकोप सुरूच राहणार असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे विशेष प्रतिनिधी डेव्हिड नाबरो यांनी दिला आहे. कोरोना विषाणूची जगभरात 18,62,244 जणांना बाधा झाली आहे. तर 1 लाख 14 हजार 980 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 4 लाख 31 हजार 666 जणांना कोरोनाच्या संसर्गापासून मुक्तता मिळाली आहे. कोरोना विषाणू मानवाचा दीर्घकाळापर्यंत पाठलाग करत राहणार असल्याचे वाटते. केवळ लसच यापासून आम्हाला वाचवू शकते असे नाबरो यांनी म्हटले आहे.
अमेरिकेत 1528 बळी
कोरोनाने सर्वाधिक ग्रस्त अमेरिका आणि तेथील न्यूयॉर्क प्रांतात एका दिवसात पडणाऱया बळींच्या संख्येत घट झाली आहे. देशात 24 तासांमध्ये 1528 जणांचा मृत्यू झाला आहे. यातही न्यूयॉर्कमध्ये केवळ 758 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर एक दिवसापूर्वी अमेरिकेत 1920 तर न्यूयॉर्कमध्ये 783 जणांचा मृत्यू झाला होता. अमेरिकेत आतापर्यंत 22 हजार 115 जणांचा बळी गेला आहे. तर 5 लाख 60 हजार 425 जणांना लागण झाली आहे. टेक्सास प्रांताचे गव्हर्नर ग्रेग अबॉट यांनी डिजास्टर डिक्लेरेशन 30 दिवसांनी वाढविले आहे.
इटलीत संकट ओसरतेय
इटलीत रविवारी 431 जणांचा मृत्यू झाला आहे. 19 मार्चनंतर बळींचा हा सर्वात कमी आकडा आहे. शनिवारी तेथे 619 जणांना जीव गमवावा लागला होता. अमेरिकेनंतर इटलीत सर्वाधिक 19 हजार 899 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1 लाख 56 हजार 363 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. इटलीत 9 मार्चपासून लागू टाळेबंदी सोमवारी संपुष्टात येणार होती. परंतु पंतप्रधान ग्यूसेप कोंटे यांनी 3 मेपर्यंत टाळेबंदी वाढविण्याचे संकेत दिले आहेत.
फ्रान्स : 1900 सैनिक विलगीकृत
फ्रान्सच्या अण्वस्त्रसज्ज चार्ल्स-डे-गुल्ले या विमानवाहू युद्धनौकेवर 50 नौसैनिकांना कोरोनाची लागण झाल्याने 1900 नौसैनिकांना विलगीकृत करण्यात आले आहे. या नौसैनिकांना युद्धनौकेवरून बाहेर काढण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान संसर्ग वाढू नये याची खबरदारी घेतली जाणार आहे. फ्रान्समध्येही प्रतिदिन बळींचा आकडा कमी झाला आहे. दिवसभरात तेथे 315 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक दिवसापूर्वी 345 जणांचा बळी गेला होता. फ्रान्समध्ये आतापर्यंत 14 हजार 393 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर एक लाख 22 हजार 591 जणांना लागण झाली आहे.
चीनमध्ये 108 नवे रुग्ण
चीनमध्ये कोरोनाचे 108 नवे रुग्ण आढळल्याची माहिती तेथील आरोग्य विभागाने दिली आहे. यातील 98 रुग्ण विदेशातून आलेले आहेत. तर 10 स्थानिक लोकांनाही कोरोनाची लागण झाली आहे. हेइलोंगजिया प्रांतात 7 तर गुआंडोंग प्रांतात 3 रुग्ण सापडले आहेत. हुबेई प्रांतात आणखी 2 जणांचा मृत्यू झाला असून 6 नव्या रुग्णांची भर पडली आहेत. चीनमध्ये आतापर्यंत 82 हजार 160 रुग्ण सापडले आहेत. तर 3,341 जणांचा मृत्यू झाला आहे.
सिंगापूरमध्ये 59 भारतीयांना लागण
सिंगापूरमध्ये रविवारी 233 नवे रुग्ण आढळले आहेत. यात 59 भारतीय नागरिकांचा समावेश आहे. यातील 51 रुग्ण समूह संसर्गाशी संबंधित आहेत. सिंगापूरमध्ये आतापर्यंत 2 हजार 532 जणांना कोरोनाची लागण झाली असून 8 जणांचा मृत्यू झाला आहे.
इस्रायलच्या माजी रब्बी प्रमुखांचा मृत्यू
इस्रायलचे माजी रब्बी प्रमुख एलियाहू बक्शी डोरेन यांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. ते 79 वर्षांचे होते. जेरूसलेमच्या शेरे जेडेक रुग्णालयाने रविवारी याची माहिती दिली आहे. रविवारी त्यांची प्रकृती अत्यंत बिघडली होती. कोरोनासह त्यांना अनेक गंभीर आजार झाले होते. त्यांनी 1993 ते 2003 या कालावधीत इस्रायलचे प्रमुख रब्बी म्हणून काम केले होते. इस्रायलमध्ये आतापर्यंत 11 हजार 145 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून 103 जणांचा मृत्यू झाला आहे.
गृहमंत्र्यांचा राजीनामा नाकारला
तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तैयप एर्दोगान यांनी गृहमंत्री सुलेमान सोयलू यांचा राजीनामा स्वीकारण्यास नकार दिला आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सोयलू यांनी देशाच्या 31 प्रांतांमध्ये 48 तासांची संचारबंदी लागू केली होती. या निर्णयामुळे हजारोंच्या संख्येत लोकांनी दुकानांमध्ये धाव घेतली होती. लोकांनी सोशल डिस्टेंसिंगचे पालन केले नव्हते तसेच मास्कही परिधान केला नव्हता. या कारणामुळे गृहमंत्र्यांवर टीकेची झोड उठली होती. यातून सोयलू यांनी रविवारी रात्री अध्यक्षांना राजीनाम्याचे पत्र सोपविले होते. तुर्कस्तानात आतापर्यंत 1200 जणांचा मृत्यू झाला असून 56 हजार 956 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
जपानमध्ये 530 नवे रुग्ण
जपानमध्ये रविवारी 530 नवे रुग्ण सापडल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी सोमवारी दिली आहे. डायमंड प्रिन्सेसन क्रूजच्या 712 बाधितांसह सोमवारपर्यंत देशभरात 7,967 रुग्ण आढळले आहेत. देशात आतापर्यंत 123 जणांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधान शिंजो आबे यांनी ट्विटरवर एक चित्रफित प्रसारित केली असून यात ते पाळीव श्वानासह आराम करताना दिसून येत आहेत. स्वतःच्या मित्रांना भेटू शकत नाही तसेच पार्टीही करू शकत नाही. अशा निर्बंधांमुळेच लोक सुरक्षित आहेत असे आबे यांनी म्हटले आहे.
दक्षिण आफ्रिका : रुग्णांमध्ये भर
दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचे 145 नवे रुग्ण सापडले आहेत. तेथे रुग्णांची संख्या वाढून 2173 झाली आहे. तर 25 जणांचा मृत्यू झाला आहे. मागील आठवडय़ात देशात अधिक संख्येत सामुदायिक चाचणी झाल्याने रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याचा दावा आरोग्यमंत्र्यांनी केला आहे. कोरोना महामारी स्थानिक तुरुंगांमध्ये फैलावल्याने 23 कर्मचाऱयांसह 3 कैद्यांनाही याची लागण झाली आहे.
चिलीत 7213 रुग्ण
कोरोनामुळे चिलीमध्ये आतापर्यंत 80 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 7 हजार 213 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. सरकारकडून प्रसिद्ध आकडेवारीनुसार चिलीमध्ये 286 नवे रुग्ण दिवसभरात वाढले असून 7 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आतार्यंत 2059 जणांना संसर्गापासून मुक्तता मिळाली आहे. डिस्चार्ज मिळालेल्या लोकांना खबरदारीच्या स्वरुपात विलगीकृत रहावे लागणार असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
ट्रम्प यांच्या मित्राचा मृत्यू
न्यूयॉर्कचे रियल इस्टेट व्यावसायिक आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मित्र स्टेनली चेरा यांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. ते 70 वर्षांचे होते. फेडरल इलेक्शन कमिशननुसार 2016 ते 2019 या कालावधीत स्टेनली यांनी ट्रम्प व्हिक्ट्री ऑर्गनायझेशनला सुमारे 4 कोटी रुपयांची देणगी दिली होती. न्यूयॉर्कमध्ये आतापर्यंत 9 हजार 385 जणांचा मृत्यू झाला आहे. तर शहरातील रुग्णांची संख्या 1 लाखापेक्षा अधिक झाली आहे. न्यूयॉर्कनंतर न्यूजर्सी प्रांतात कोरोनाचे सर्वात मोठे संकट निर्माण झाले असून तेथे आतापर्यंत 2 हजार 350 जणांचा मृत्यू झाला आहे.