वृत्तसंस्था/ व्हिएन्ना
ऑस्ट्रिया या युरोपीय देशात कोविड लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. या लॉकडाउन दरम्यान लस न घेतलेल्या लोकांवर घरामधून बाहेर पडण्यास बंदी असणार आहे. ऑस्ट्रियाचे चॅन्सेलर अलेक्झेंडर स्कालेनबर्ग यांनी लॉकडाउन सोमवारपासून लागू झाल्याचे म्हटले आहे. कोरोनावरील लस न घेतलेले लोक केवळ अत्यंत आवश्यक कामांसाठीच घरातून बाहेर पडू शकतील.
कोरोना लसीचा डोस न घेतलेले लोक केवळ कार्यालयात जाणे, दैनंदिन सामग्रीची खरेदी किंवा वैद्यकीय आपत्कालीन स्थितीत घराबाहेर पडू शकतात. लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय ऑस्ट्रियामधील राज्यांचे सरकार आणि प्रमुखांनी मिळून घेतला आहे.
हा लॉकडाउन सोमवार पहाटेपासून लागू झाला आहे. यादरम्यान पोलीस प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या पालनावर देखरेख ठेवतील आणि गुन्हेगारांना शिक्षेला तोंड द्यावे लागेल. ऑस्ट्रियामध्ये कोरोना संक्रमणाची स्थिती सध्या स्थिर आहे. पण युरोपीय देशांमधील वाढते संक्रमण पाहता सरकार कुठलीच जोखीम पत्करू इच्छित नसल्याचे स्कालेनबर्ग म्हणाले.
लाखो लोकांवर थेट प्रभाव
नवे निर्बंध ऑस्ट्रियाच्या 89 लाख लोकसंख्येपैकी सुमारे 20 लाख लोकांना प्रभावित करणार आहेत. लॉकडाउन 12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांवर लागू होणार नाही, कारण ते देशाच्या कायद्यांतर्गत कोरोना लसीकरणास पात्र नाहीत. ऑस्ट्रियामध्ये आतापर्यंत 60 लाख लोकांनाच कोरोना लसीचा किमान एक डोस मिळाला आहे.
लसीकरणाचा मंद वेग
पश्चिम युरोपमध्ये ऑस्ट्रियातच लसीकरणाचे प्रमाण सर्वात कमी आहे. आतापर्यंत एकूण लोकसंख्येच्या सुमारे 65 टक्के लोकांचेच लसीकरण करण्यात आले आहे. देशात मागील काही आठवडय़ांमध्ये नव्या बाधितांचे प्रमाण वाढले आहे. शनिवारी ऑस्ट्रियामध्ये 13,152 हून अधिक नवे रुग्ण सापडले होते.