सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणाऱया लसीचा मोठा प्रवास : जगभरात 2.51 कोटी बाधित
जगभरात सद्यकाळात आता कोरोनाच्या रुग्णांपेक्षा अधिक लसीची चर्चा आहे. भारतासह बहुतांश देश चालू वर्षाच्या अखेरपर्यंत कोरोनावरील लस उपलब्ध होणार असल्याचे म्हणू लागले आहेत. परंतु लस तयार करण्याइतकेच जगभरातील लोकांपर्यंत ती पोहोचविण्याचे कामही आव्हानात्मक असणार आहे. लसीचा प्रवास सोपा नसतो. ती अनेक टप्प्यांना पार करत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत असल्यानेच ती तयार होण्यास वर्षे लागतात.
विषाणूची पडताळणी
सर्वप्रथम विषाणू पेशींना कसा प्रभावित करतो याचे संशोधन करावे लागते. मानवी इम्युन सिस्टीम वाढविण्यासाठी त्याच विषाणूचा वापर होऊ शकतो का हे तपासले जाते. अँटीबॉडीज होऊन इम्युनिटी वाढविणाऱया एंटीजनचा शोध घेतला जातो.
प्राण्यांवर चाचणी
मानवी परीक्षणापूर्वी कुठलीही लस किंवा औषध सुरक्षित आणि उपयुक्त आहे की नाही हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे. याचमुळे सर्वप्रथम प्राण्यांवर परीक्षण केले जाते. यात यश मिळाल्यावरच पुढील काम सुरू होते, ज्याला फेज-1 सेफ्टी ट्रायल्स म्हटले जाते.
क्लीनिकल ट्रायल
या टप्प्यात पहिल्यांदाच मानवांवर परीक्षण केले जाते आणि याचेही तीन टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात 18 ते 55 वयोगटातील 20-100 तंदुरुस्त लोकांवर परीक्षण करून पुरेशी इम्युनिटी तयार होतेय की नाही हे पाहण्यात येते. दुसऱया टप्प्यात 100 पेक्षा अधिक जणांवर चाचणी होते आणि यात वृद्ध आणि मुलेही सामील असतात. लसीचा प्रभाव वेगळा नसल्याचे पाहिले जाते. तिसऱया टप्प्यात हजारो जणांना लस दिली जाते. सर्वकाही सुरळीत पार पडल्यावर लस यशस्वी ठरल्याची घोषणा केली जाते. मंजुरीनंतर उत्पादन सुरू होते.
कोरडय़ा बर्फात ठेवतात लस
लस तयार झाल्यावर ती विशेष प्रकारच्या इन्सुलेटेड डब्यांमध्ये साठविली जाते. लसीला थंड ठेवण्यासाठी ती कोरडा बर्फ किंवा गोठलेल्या कार्बन डायऑक्साईडयुक्त डब्यांमध्ये ठेवण्यात येते. या डब्यांना मोठमोठय़ा फ्रीजरमध्ये ठेवले जाते. या फ्रिजरच्या ठिकाणी पीपीई किट परिधान करून काम करावे लागते. ग्लोव्ह्ज आणि चष्माही अनिवार्य असतो.
साठवणूककक्षाचे तापमान
लोकांपर्यंत लस पोहोचविण्यासाठी ती इन्सुलेटेड डब्यांमध्ये कोरडा बर्फ घालून पॅक केली जाते आणि गरजेच्या ठिकाणी पाठविण्यात येते. उणे 20 अंश तापमान असलेल्या कक्षात ती ठेवावी लागते. सर्वसाधारणपणे लसीसाठी 2 ते 8 अंश तापमान आदर्श मानले जाते.
5 साठवणुकीचे आव्हान
लसीचे उत्पादन आणि वितरणातही अनेक आव्हाने आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर वितरणासाठी गावी या संस्थेने 2 अब्ज डोसकरता पुरेशा बाटल्या खरेदी केल्या आहेत. 2021 पर्यंत इतके डोस उपलब्ध होऊ शकतात. परंतु त्याहून अधिक काचेच्या बाटल्या उपलब्ध करणे अवघड ठरू लागले आहे. तसेच लस ठेवण्यासाठी आवश्यक फ्रिजची कमतरताही संस्थेला भासू लागली आहे.
जगभरात 170 लसींवर काम
जागतिक आरोग्य संघटनेनुसार सद्यकाळात जगभरात सुमारे 170 लसींवर काम सुरू आहे. यातील 30 लसींची क्लीनिकल ट्रायल सुरू आहे. यातील सर्व लसी उणे 80 अंश सेल्सिअसमध्ये ठेवण्याची गरज नाही. परंतु कुठल्याही प्रकारची लस तयार झाली तरीही ती लोकांपर्यंत पोहोचविताना साठवणूक क्षमतेचा अभाव भासू नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
ऑकलंडमधील टाळेबंदी हटविली
जगभरात कोरोना महामारीची लागण आतापर्यंत 2 कोटी 51 लाख 91 हजार 816 जणांना झाली आहे. यातील 1 कोटी 75 लाख 42 हजार 928 बाधित संसर्गमुक्त झाले आहेत. तर 8 लाख 47 हजार 136 रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. न्यूझीलंडने रविवारी ऑकलंडमधील टाळेबंदी हटविण्याची घोषणा केली आहे. तेथे नव्याने रुग्ण सापडल्यावर 17 ऑगस्ट रोजी टाळेबंदी लागू करण्यात आली होती. मागील 24 तासांमध्ये ऑकलंडमध्ये केवळ 2 नवे रुग्ण सापडले आहेत. महामारी पाहता कठोर टाळेबंदीचे पालन केल्याबद्दल लोकांचे आभार मानत असल्याचे पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी म्हटले आहे. आमची यंत्रणा उत्तम असून लोकही समजुतदार असल्याचे त्या म्हणाल्या. ऑकलंडमध्ये अद्याप घरातून बाहेर पडल्यावर आणि सार्वजनिक वाहतूक सेवेतून प्रवास करताना मास्क लावणे अनिवार्य आहे. देशात सध्या 136 सक्रीय रुग्ण असून यातील 10 जण रुग्णालयात दाखल आहेत.
ब्राझील : 1.20 लाख बळी
ब्राझीलमध्ये 24 तासांत 41 हजार 350 नवे रुग्ण सापडले असून 758 जणांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील बळींचा आकडा 1 लाख 20 हजार 498 झाला आहे. तेथील साओ पाउलो प्रांतात सर्वाधिक बळी गेले आहेत. दिवसभरात साओ पाउलो येथे 250 जणांना जीव गमवावा लागला आहे. देशात आतापर्यंत 38 लाख 46 हजार 945 रुग्ण सापडले आहेत. विषाणू देशाच्या आदिवासीबहुल जावेरी खोऱयापर्यंत पोहोचला आहे. तेथे मारुओ आणि तिकुना समुदायाच्या प्रत्येकी एका आदिवासीचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.
जर्मनी : संसदेबाहेर निदर्शने
जर्मनीत संसदेसमोर लोकांनी सरकारच्या विरोधात निदर्शने केली आहेत. हजारो लोकांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे. मास्कची अनिवार्यता आणि महामारीच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेले अन्य निर्बंध हटविण्यात यावेत अशी मागणी या निदर्शकांनी केली आहे. काही निदर्शकांनी सुरक्षा कर्मचाऱयांवर दगडफेकही केली आहे. या प्रकारानंतर 200 जणांना अटक करण्यात आली आहे. देशात आतापर्यंत 2 लाख 42 हजार 825 रुग्ण सापडले असून 9,363 जणांचा मृत्यू ओढवला आहे.
तंबाखूने तयार झाली लस
थायलंडच्या चुलालोंगकोर्न विद्यापीठाने तंबाखूच्या पानांशी विषाणूचा डीएनए मिळवून लस तयार केली आहे. थाई रेडक्रॉस इमर्जिंग इनफेक्शियस डिसिज हेल्थ सायन्स सेंटरचे प्रमुख डॉ. तिरावट हेमाशुदा यांनी यासंबंधीची माहिती दिली आहे. सध्या या लसीची उंदिर आणि माकडांवर चाचणी करण्यात आली आहे. दुसऱया टप्प्यात मानवी परीक्षण करण्यात येणार आहे. दोन प्रकारच्या तंबाखूंच्या पानांच्या प्रोटिनच्या मदतीने ही लस तयार करण्यात आली आहे. याचे उत्पादन अन्य लसीच्या तुलनेत स्वस्त असणार आहे.
ऑस्ट्रेलिया : निर्बंध कायम
ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया प्रांतात सध्या निर्बंध शिथिल केले जाणार नाहीत. मागील 24 तासांमध्ये तेथे 114 नवे रुग्ण सापडले असून 11 बळी गेले आहेत. सद्यस्थितीत निर्बंध शिथिल केल्यास रुग्णसंख्या अधिकच वाढू शकते असे विधान प्रीमियर डॅनियल एंड्रूज यांनी केले आहे. ऑस्ट्रेलियात सर्वाधिक बळी व्हिक्टोरिया प्रांतातच गेले
दक्षिण कोरियात संसर्ग मंद
दक्षिण कोरियात दिवसभरात 299 नवे रुग्ण सापडले आहेत. 5 दिवसांनी पहिल्यांदाच देशात 300 पेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत. यातील 283 रुग्ण देशांतर्गत संसर्गाशी संबंधित आहेत. मागील आठवडय़ात देशात नव्या रुग्णांची संख्या वाढल्याने सरकारने सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे कठोर पालन करविण्याची घोषणा केली होती. या धोरणामुळेच रुग्णसंख्या कमी झाल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. देशात आतायर्पंत 19 हजार 699 रुग्ण सापडले असून 323 जणांचा मृत्यू झाला आहे.