ऑनलाईन टीम / पुलवामा :
मोबाईल गेममध्ये खेळला जाणारा पब्जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांमध्ये लोकप्रिय आहे. परंतु हा गेम आता जीवघेणा बनत चालला आहे. लहान मुले तणावाखाली येऊन आत्महत्या करत आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार पुलवामामध्ये घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका 13 वर्षाच्या मुलाने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला. संबधित मुलाला त्याच्या लहान भावाने गेम खेळण्यासाठी मोबाईल दिला नाही त्यामुळे त्याने हे पाऊल उचलले. दरम्यान, पोलिसांनी तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे. या प्रदेशात पब जी मुळे मृत्यू झाल्याची ही दुसरी घटना आहे.
पुलवामा जिल्ह्यातील कस्बेयार गावातील डांगेरपोरा मोहल्ल्यात ही घटना घडली. आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव असरार अहमद असे आहे. असरार आपल्या लहान भावाबरोबर स्वतःच्याच घरात वडिलांच्या मोबाईलवर पब्जी गेम खेळत होता. त्या दरम्यान असरारने लहान भावाकडे पब्जी खेळण्यासाठी मोबाईल मागितला. परंतु लहान भावाने मोबाईल देण्यास नकार दिला. त्यामुळे नाराज झालेला असरार तिथून निघून गेला आणि त्याने फाशी लावून घेत आत्महत्या केली.