‘बायोलॉजिकल-ई’च्या चाचण्यांना डीसीजीआयची मंजुरी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
बायोलॉजिकल-ई कंपनीकडून तयार करण्यात आलेल्या दुसऱया आणि तिसऱया टप्प्याच्या चाचणीला काही अटींच्या आधारे मंजुरी देण्यात आली आहे. कोविड-19 विषयक तज्ञ समितीच्या शिफारशीवरून ‘द ड्रग्ज कन्ट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ने (डीसीजीआय) चाचण्यांना ही परवानगी दिली आहे. या लसीला परवानगी मिळाल्यानंतर ती 5 ते 18 वयोगटातील मुलांसाठी वापरण्यात येणार आहे. चाचण्यांमध्ये सकारात्मक परिणाम दिसून आल्यास देशात मुलांसाठी वापरण्यात येणारी ही चौथी लस ठरणार आहे.
देशातील 5 ते 18 वयोगटातील मुलांसाठी बायोलॉजिकल-ई कंपनीची ही लस असणार आहे. हैदराबादच्या कंपनीकडून या लसीची निर्मिती करण्यात येत आहे. देशभरातील 10 ठिकाणी या लसीची दुसऱया आणि तिसऱया टप्प्यातील चाचणी करण्यात येणार आहे.
झायडस कॅडिला कंपनीने कोविड-19 वरील लस झायकोव्ह-डीच्या आपत्कालीन वापरासाठी ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे परवानगी मागितली आहे. कोविड-19 लससाठी आतापर्यंत भारतातील 50 हून अधिक केंद्रांमध्ये वैद्यकीय चाचणी केली आहे. या लसीला मंजुरी मिळाली तर यामुळे केवळ प्रौढच नव्हे तर 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना देखील लाभ होईल. इंजेक्शनच्या मदतीशिवाय फार्माजेट तंत्रज्ञानाद्वारे ही लस दिली जाईल. या तंत्राचा वापर केल्यास लसीनंतर दुष्परिणाम होण्याचा धोका कमी होईल. या लसीला मंजुरी मिळाली, तर कोरोनाला रोखण्यासाठी ही जगातील पहिली डीएनए-आधारित लस असणार आहे.