प्रतिनिधी/ लांजा
आपल्याकडे दाखल झालेल्या 9 कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या माहितीचा अहवाल तातडीने तहसील कार्यालयास सादर न केल्याप्रकरणी लांजा तहसीलदार उज्ज्वला केळुस्कर यांनी लांजा येथील संबंधित खासगी कोरोना सेंटरला नोटीस बजावली आहे.
कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण सापडूनही त्या बाबतचा अहवाल कार्यालयाला सादर न करणे, ही बाब अत्यंत गंभीर आहे. तसेच यापुढे बाहेरून आलेल्या व्यक्तींची आपल्या सेंटरमध्ये तपासणी करण्यापूर्वी तपासणी केंद्र, पंचायत समिती सभागृह लांजा येथे येथे तपासणी व नोंदणी झाली आहे का, याची खात्री व चौकशी करून पुढील कार्यवाही करावी, अशा स्पष्ट सूचना तहसीलदार उज्ज्वला केळुस्कर यांनी खासगी कोरोना सेंटर चालकांना दिल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणात संबंधित खासगी कोरोना सेंटर चालकच दोषी असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. केरळवरून 19 सप्टेंबर रोजी आलेले लक्ष्मी बेकरीतील 9 कामगार हे थेट येथील एका खासगी कोरोना सेंटरमध्ये दाखल झाले होते. मात्र याची माहिती तब्बल तिसऱया दिवशी तालुका आरोग्य विभाग व नगर पंचायतीला मिळाल्यानंतर लक्ष्मी बेकरीवर कारवाई करण्यात आली होती.
या पार्श्वभूमीवर कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या माहितीचा अहवाल तातडीने तहसील कार्यालयास सादर न केल्याप्रकरणी लांजा तहसीलदार उज्ज्वला केळुस्कर यांनी लांजा येथील संबंधित खासगी कोरोना सेंटरला नोटीस बजावली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, केरळवरून 19 सप्टेंबर रोजी आलेले लक्ष्मी बेकरीतील 9 कामगारांनी पंचायत समिती सभागृह, लांजा येथे तपासणी केंद्रावर न जाता परस्पर आपणाकडे आल्याचे निदर्शनास आले आहे. आपण त्याची खात्री न करता या कामगारांना आपल्या केंद्रात दाखल करून घेतले आहे. ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे तहसीलदार केळुस्कर यांनी म्हटले आहे. तसेच 9 कामगार कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतरही लक्ष्मी बेकरी 3 दिवस सुरू होती. यातून नागरिकांना जास्त धोका निर्माण झाल्याचे दिसून येते. यापुढे बाहेरून आलेल्या व्यक्तीची आपल्या सेंटरमध्ये तपासणी करण्यापूर्वी तपासणी केंद्र, पंचायत समिती सभागृह लांजा येथे येथे तपासणी व नोंदणी झाली आहे का, याची खात्री व चौकशी करून पुढील कार्यवाही करावी. तसेच कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण मिळाल्यानंतर त्या बाबतचा अहवाल आरोग्य विभाग, पंचायत समिती, नगर पंचायत व तहसील कार्यालयाला कळविण्याची दक्षता घ्यावी, अशा सूचना तहसीलदार केळुस्कर यांनी लांजा येथील संबंधित खासगी कोरोना सेंटरला दिल्या आहेत.