प्रतिनिधी/ लांजा/राजापूर
अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि अटीतटीच्या ठरलेल्या लांजा नगरपंचायत निवडणुकीमध्ये शिवसेनेने आपले वर्चस्व कायम राखत नगराध्यक्षपदासह 10 जागांवर विजय मिळवत लांजा नगरपंचायतीवर भगवा फडकावला आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का देत मतदारांना नवीन चेहऱयांना संधी दिल्याचे दिसले. मागील 5 वर्षात सत्तेत असणाऱया काँग्रेस आघाडीला यावेळी मात्र अवघ्या 2 जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेसला 2 जागा मिळाल्या तर राष्ट्रवादीला खातेही खोलता आले नाही. भाजपाने 2 जागा जिंकत खाते खोलले तर अपक्षांनीही 3 जागांवर विजय मिळवत राजकीय पक्षांना धक्का दिला.
लांजा नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. शहरातील सांस्कृतिक भवन येथे सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरूवात झाली. अवघ्या तासाभरात मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाली. यामध्ये लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या लढतीत शिवसेनेच्या मनोहर धनाजी बाईत यांनी काँग्रेसच्या राजेश रामचंद्र राणे यांचा 617 मतांनी दणदणीत पराभव करत विजय संपादन केला. यामध्ये बाईत यांना 3546 तर राणे यांना 2929 मते मिळाली. तर नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणाऱया अन्य उमेदवारांपैकी अपक्ष उमेदवार संपदा योगेश वाघदरे यांना 1563 मते भाजपाच्या सुमंत गजानन वाघदरे यांना 1087 मते तर अपक्ष उमेदवार रूपेश विजय गांगण यांना 537 मते मिळाली. तसेच 98 मतदारांनी नोटाला मतदान केले. लांजा नगरपंचायतीच्या 17 प्रभागांमधून शिवसेनेचे 9, भाजपा दोन, अपक्ष 4, काँग्रेस 2 असे 17 नगरसेवक निवडून आले.
दरम्यान प्रभाग 1 मधून अपक्ष राजेश हळदणकर, प्रभाग 2 मधून सेनेच्या पूर्वा मुळे, प्रभाग 3 मधून अपक्ष दुर्वा भाईशेटय़े, प्रभाग 4 मधून सेनेचे लवू कांबळे, प्रभाग 5 मधून मंगेश बापेरकर बिनविरोध, प्रभाग 6 मधून सेनेचे प्रसाद डोर्ले, प्रभाग 7 मधून भाजपाच्या शितल सावंत, प्रभाग 8 मधून केग्रेसच्या मधुरा लांजेकर, प्रभाग 9 मधून काँग्रेसचे रफिक नेवरेकर, प्रभाग 10 मधून भाजपाचे मंगेश लांजेकर, प्रभाग 11 मधून सेनेच्या सोनाली गुरव, प्रभाग 12 मधून सेनेच्या वंदना काटगाळकर, प्रभाग 13 मधून भाजपाचे संजय यादव, प्रभाग 14 मधून सेनेच्या यामिनी जोईल, प्रभाग 15 मधून सेनेचे स्वरूप गुरव, प्रभाग 16 मधून सेनेच्या समृध्दी गुरव तर प्रभाग क्रमांक 17 मधून सेनेचे सचिन डोंगरकर हे विजयी झाले आहेत.
लांजाच्या विकासासाठी सदैव कटिबध्द राहणार: बाईत
मिळालेला विजय हा सेनेच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व लांजा शहरातील सर्व जनतेचा आहे. शिवसेनेने दिलेली संधी आणि लांजा-कुवेवासीयांनी आपणावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवताना लांजा शहराच्या विकासासाठी आपण सदैव कटिबद्ध राहू. आपल्या यशात खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी यांचे फार मोठे योगदान असल्याचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष मनोहर बाईत यांनी सांगितले.
कोकणात शिवसेनेचेच वर्चस्व: आमदार साळवी
कोकणात शिवसेनेचेच वर्चस्व आहे आणि ते यापुढेही कायम राहील, हे या निकालाने दाखवून दिले आहे. राज्यात सेना-काँग्रेस-राष्ट्रवादी अशी आघाडी आहे. मात्र कोकणात शिवसेना कोणाच्याही पाठिंब्याशिवाय विजय मिळवू शकते. शिवसेनाच लांजा शहराचा विकास करू शकते, असा विश्वास येथील जनतेमध्ये असल्याने लांजावासीयांनी पुन्हा एकदा सेनेकडे सत्ता दिली आहे. तो विश्वास शिवसेना नक्कीच सार्थ ठरवेल. लांजाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू, असे आमदार राजन साळवी यांनी सांगितले.