प्रतिनिधी/. लांजा
लांजा तालुक्यात बुधवारी दिवसभर पडलेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र दाणादाण उडवली. लांजा- साटवली मार्गावर बापेरे येथे मोठे झाड पडल्याने मार्ग तब्बल 4 तास ठप्प पडला होता.
लांजा- साटवली मार्गावर बापेरे येथे लोकवस्ती नसल्याने वृक्ष हटवण्यासाठी वाहन चालकांसमोर मोठा प्रश्न पडला होता. यामुळे अनेक वाहन चालकांनी परतीचा मार्ग स्विकारला. लांजाहून साटवलीकडे व राजापुरकडे निघालेली वाहने पुन्हा लांजाकडे परतली तर साटवली, राजापुर येथून लांजाच्या दिशेने निघालेली वाहने दसूर- वडदहसोळ- ओणी मार्गे वळविण्यात आली. तब्बल 4 तास झाले तरी झाड हटविण्यात आले नव्हते. दरम्यान बुधवार सकाळपासूनदिवसभर पडलेल्या मुसळधारपणे पावसामुळे तालुक्यातील काजळी, मुचकुंदी, बेनी या मुख्य नद्यांची पात्रे दुथडी भरुन वाहत होती. लांजा बाजारपेठ व मुंबई-गोवा महामार्गावरही पाणीच पाणी झाले होते. यासह वहाळ, नदी पात्रांमधुन चढणीचे मासे पकडण्यासाठी खवयांची धावपळ उडाली होती. मात्र पावसाने दमदारपणे सुरूवात काल्याने बळीराज सुखावला आहे.