प्रवाशांच्या संख्येत वाढ, बससेवा सुरळीत
प्रतिनिधी /बेळगाव
अनलॉकनंतर सुरू झालेल्या बससेवेला प्रवाशांचा हळूहळू प्रतिसाद वाढत आहे. विविध मार्गांवर स्थानिकसह लांबपल्ल्याच्या बस धावत आहेत. सर्वत्र व्यवहार सुरळीत सुरू झाल्याने लांबपल्ल्याच्या प्रवाशांची संख्या वाढल्याने वातानुकूलित बससेवा सुरळीत झाली आहे. मध्यवर्ती बसस्थानकातून विविध शहरांकडे वातानुकूलित बस धावत आहेत. मागील दोन दिवसांपासून प्रवाशांच्या प्रतिसादामुळे बसस्थानकातून बेळगाव-बेंगळूर ही वातानुकूलित बस धावत आहे. शिथिलतेमुळे बाजारपेठेसह मॉल, उद्योगधंदे, दुकाने व इतर सर्वच व्यवहार रूळावर येत आहेत. त्यामुळे स्थानिक प्रवाशांसह लांबपल्ल्याच्या प्रवाशांची ये-जा वाढली आहे. मुंबई, पुणे, ठाणे, बेंगळूर, म्हैसूर, बळ्ळारी, गोवा, बिदर, हैदराबाद आदी ठिकाणी प्रवास करणाऱया प्रवाशांची संख्या वाढली आहे. प्रवाशांच्या सोयीखातर बसस्थानकाच्या आवारात आगाऊ तिकीट आरक्षणाची व्यवस्था सुरू आहे. वातानुकूलित बससेवा पूर्ववत सुरू झाल्याने महसुलात वाढ होत आहे. मुंबई, ठाणे, बेंगळूर, म्हैसूर, बळ्ळारी, बिदर, गोवा, हैदराबाद, नाशिक आदी ठिकाणी वातानुकूलित बससेवा सुरू आहे.
बसस्थानकातून धावणाऱया वातानुकूलित बसेसचे वेळापत्रक
धावणाऱया बसेस | वेळ |
बेळगाव-ठाणे | रात्री 8 वाजता |
बेळगाव-बेंगळूर | दुपारी 12 व रात्री 8 वा. |
बेळगाव-म्हैसूर | सायं. 7.30 वा. |
बेळगाव-बळ्ळारी | रात्री 10 वा. |
बेळगाव-बिदर | रात्री 9 वा. |
बेळगाव-गोवा | सकाळी 9.30 वा |
बेळगाव-हैदराबाद | सायं 7.30 वा. |
बेळगाव-नाशिक | सकाळी 7 वा. |