दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सध्या स्वतःच्या आगामी ‘लाइगर’ चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त आहेत. मागील दोन दिवस अनन्याने याचे चित्रिकरण वांद्रय़ातील एका निर्माणाधीन इमारतीत केले आहे. कोरोनामुळे मुंबईच्या नागरी वस्तींमध्ये चित्रिकरणाची परवानगी मिळत नसल्याने निर्माते मुंबईच्या बाहेर जाऊन चित्रिकरण करत आहेत, किंवा शहरातील निर्माणाधीन इमारतींचा पर्याय स्वीकारत आहेत.
डेमो फ्लॅटमध्ये चित्रिकरण करण्यासाठी निर्माते एका दिवसासाठी 2.25 लाख रुपयांचे भाडे देत आहेत. डेमो फ्लॅटमध्ये अनन्याने केवळ स्वतःच्या वाटय़ाला आलेली दृश्ये चित्रित केली आहेत. विजय देवरकोंडा मुंबईत पोहोचला असून त्यानेही चित्रिकरणात भाग घेतला आहे.
निर्मात्याच्या श्वानाचे नाव चित्रपटाला
निर्मात्या चार्मी कौर यांच्या सुचनेनुसारच करण जौहरने चित्रपटाचे नाव बदलल्याचे समजते. यापूर्वी याचे नाव ‘फायटर’ होत. पण चार्मी कौरने या चित्रपटाचे नाव आपला पाळीव श्वान ‘लाइगर’च्या नावावर ठेवण्याची सूचना केली आहे. या नावाचा अर्थ शक्ती आणि इमानदारीचे प्रतीक असा होतो.