वनविभागाची कारवाई – टेम्पो, ट्रक्टर, लाकडासह लाखोंचा मुद्देमाल हस्तगत
प्रतिनिधी/ सातारा
सातारा वनविभागाने कोडोली, देगाव फाटा परिसरात आंबा, अशोक व भोकर आदी झाडांची अवैधरित्या तोड करुन त्याची वाहतूक करणाऱया जयवंत रामचंद्र वाघमळे व शंकर रामचंद्र वाघमळे (दोघेही रा. कण्हेर, ता. सातारा) यांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातील अवैध तोडलेली लाकडे, टेम्पो, ट्रक्टर असा लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी कोडोली व देगाव फाटा परिसरातून अवैध लाकूड वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱयांनी सापळा रचला. यावेळी आंबा, अशोक, भोकर इत्यादी झाडांची अवैधरित्या तोड करून ट्रक्टर व टेम्पोच्या सहाय्याने विनापरवाना वाहतूक करत असताना या दोन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातील लाकडाने भरलेला ट्रक्टर क्रमांक एम. एच. 09 ए. 7583 व टेम्पो क्रमांक एम. एच. 13 टी 8440 अशी दोन वाहने लाकूड माल जप्त करण्यात आला.
ही कारवाई उपवनसंरक्षक महादेव मोहिते, सहाय्यक वनसंरक्षक सातारा सुधीर सोनवले यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल सातारा निवृत्ती चव्हाण, वनपाल परळी प्रशांतकुमार पडवळ, वनरक्षक सातारा सुहास भोसले, राजकुमार मोसलगी, वनरक्षक भरतगाव, दशरथ फाळके वनरक्षक कुसवडे, वाहनचालक संतोष दळवी यांनी केली.
याप्रकरणी वनरक्षक सुहास भोसले यांनी तक्रार दाखल केली असून संशयितांवर भारतीय वन आधिनियम 1927 कलम 41 2 (ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे वनक्षेत्रपाल चव्हाण यांनी सांगितले.