मैत्रिणींनो, लालचुटुक टोमॅटो पदार्थांची, भाजीची चव वाढवतात. टोमॅटोच्या पिकावर घातक किटकनाशकांची फवारणी होते. त्यामुळे हे टोमॅटो वापरण्याआधी स्वच्छ धुवावे लागतात. ही घातक रसायनं पोटात जाऊन अपाय होऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही घरीच कुंडीत टोमॅटोची लागवड करू शकता. घरच्या कुंडीतले टोमॅटो खाताना खूप गंमत वाटेल. तुम्हाला बागकामाची आवड असेल तर फावल्या वेळात टोमॅटोची लागवड करता येईल.
टोमॅटो उष्णकटीबंधीय रोप आहे. त्यामुळे भारतातल्या उष्ण वातावरणात याची चांगली वाढ होईल. टोमॅटोची लागवड करण्यासाठी बिया लागतील. या बिया नर्सरीतून खरेदी करता येतील. तुमच्याकडे टोमॅटोच्या बिया नसतील तर काळजी करू नका. घरातला टोमॅटो घ्या. त्याचे चार तुकडे करा. तुम्ही लागवडीसाठी तयार केलेल्या कुंडीतल्या मातीत टोमॅटोचे तुकडे पेरा. टोमॅटोचे तुकडे साधारण मातीच्या अर्धा इंच आत पेरा. आता अंकुर फुटायला साधारण तीन ते चार आठवडय़ांचा काळ लागेल. यानंतर रोपाला नीट पाणी घालत रहा. सेंद्रिय खत वापरा. टोमॅटोचं रोपटं उंच होतं. त्यामुळे त्याला वाढीसाठी आधार लागेल. तसंच हे रोपटं थंड वातावरणात ठेऊ नका. थंडीत रोपटं घरात ठेवा. या रोपटय़ाला बारा महिने टोमॅटो लागतील.