ऑनलाईन टीम / नाशिक :
शिक्षणसंस्थेकडून आठ लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ताब्यात घेतलेल्या व चौकशीनंतर घरी परतलेल्या नाशिक जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर-वीर या दुपारी अडीच वाजेपर्यंत न्यायालयात हजर न झाल्यामुळे त्यांना लाचलुचपत विभागाने फरार घोषित केले आहे. त्यांच्या विरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध सुरू आहे.
सरकारने मंजूर केलेल्या दोन शिक्षण संस्थांशी संबंधित शाळांमध्ये 20 अनुदानानुसार नियमत वेतन सुरू करण्याचा कार्यादेश काढण्यासाठी वैशाली झनकर यांनी 9 लाख रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती आठ लाख रुपये देण्याचे ठरले होते. दरम्यान तक्रारदाराने ठाणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. काल संध्याकाळी साडेपाच वाजता शासकीय वाहन चालक ज्ञानेश्वर सूर्यकांत येवले यांच्यामार्फत ही लाच त्र्यंबकनाका परिसरात स्वीकारत असतांनाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चालक येवलेला रंगेहाथ पकडले. ठाणे लाचलुचपत विभागाने केलेली ही कारवाई केली.
चौकशीनंतर शिक्षणधिकारी झनकर घरी परतल्या होत्या. सकाळी साडेआठ वाजता न्यायालयात हजर होण्याचे आदेश एसीबीने त्यांना दिले होते. मात्र, हे आदेश धुडकावून वैशाली झनकर-वीर गैरहजर राहिल्या आहेत. त्या फरार झाल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणातील अन्य दोन संशयित शासकीय वाहनचालक ज्ञानेश्वर येवले आणि प्राथमिक शिक्षक पंकज दशपुते या दोघांना जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले आहे. या दोघांना नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयानं 13 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.