सातारा / प्रतिनिधी
पाटबंधारे विभागाच्या निरा उजवा कालवा, फलटण कार्यालयातील वर्ग 3 च्या पाटकऱयाला दोन हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी 4 वर्षे सक्तमजुरी व 2 हजार रुपये दंड तसेच दंड न दिल्यास 3 महिने सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. विशेष न्यायालय सातारा येथील विशेष न्यायाधीश एन. एल. मोरे यांनी हि शिक्षा ठोठावली. रमेश आप्पासो पवार असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबतची माहीती अशी, पाटबंधारे विभागाच्या निरा उजवा कालव्याचे मुंजवडी (ता. फलटण) येथील शेतकऱयास उसाच्या शेताला पाणी देण्यासाठी पाटकरी रमेश पवार याने दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी संबंधित शेतकऱयाने दि. 20 मे 2015 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार रमेश पवार यास लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. याप्रकरणी फलटण ग्रामिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हय़ाचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तत्कालीन पोलीस निरीक्षक वैशाली पाटील यांनी करून विशेष न्यायालय, सातारा दोषारोपपत्र दि. 29 डिसेंबर 2015 रोजी दाखल केले होते. याप्रकरणी आज दि. 10 रोजी विशेष न्यायाधीश एन. एल. मोरे यांच्या कोर्टात सुनावणी झाली. त्यामध्ये पाटकरी रमेश आप्पासो पवार यास दोषी धरत 4 वर्षे सक्त मजुरी व 2 हजार रुपये दंड व दंड न दिलेस 3 महिने सक्त मजुरी अशी शिक्षा सुनावली आहे.
या खटल्यात सहायक सरकारी वकील मंजुषा तळवळकर यांनी सरकारपक्षातर्फे काम पाहिले. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणेचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे व अपर पोलीस अधीक्षक सुषमा चव्हाण यांनी खटल्यात वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे. तसेच सदर गुन्हय़ाचे न्यायालयीन कामकाजात पैरवी अधिकारी म्हणून सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक अशोक शिर्के, पोलीस हवालदार विजय काटवटे यांनी मदत केली.