प्रतिनिधी / ओरोस:
बेकायदेशीर मासेमारी करीत असताना पकडण्यात आलेल्या ट्रॉलरवर कारवाई न करण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या प्रभारी सहाय्यक मत्स्य आयुक्त प्रदीप वस्त (53) आणि परवाना अधिकारी शिवराज चव्हाण (32) या दोघांनाही विशेष न्यायाधीश श्रीमती एस. एस. घोडके यांनी न्यायालयीन कोठडी मंजूर केली. संशयित आरोपी वस्त याच्यावतीने ऍड. संग्राम देसाई, ऍड. अविनाश परब यांनी, तर चव्हाण याच्यावतीने ऍड. स्वरुप पई आणि ऍड. यतीश खानोलकर यांनी काम पाहिले.
शुक्रवारच्या रात्री बेकायदेशीररित्या मासेमारी करणारा एक पर्ससीन ट्रॉलर मत्स्य विभागाच्या संबंधित अधिकाऱयांनी पकडला होता. त्यानंतर त्यावरील कारवाई टाळण्यासाठी तब्बल पाच लाखाची लाच मागण्यात आली होती. पहिला हप्ता दोन लाख रुपये व त्यापुढेही मासेमारी करू देण्यासाठी तीन लाख अशी एकूण पाच लाख रुपयांची मागणी होती. याबाबतची तक्रार संबंधित पर्ससीन ट्रॉलरचालकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यानुसार सापळा रचून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱयांनी प्रदीप वस्त आणि शिवराज चव्हाण यांना दोन लाख रुपये स्वीकारताना मालवण येथील मत्स्य व्यवसाय कार्यालयात 4 जानेवारी रोजी सायंकाळी रंगेहात पकडले होते.
रविवारी ओरोस येथील लाचलुचपत प्रकरणातील विशेष न्यायालयाने दोन्ही संशयितांना 7 जानेवारीपर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर 7 रोजी त्यांना न्यायालयीन कोठडी मंजूर करण्यात आली.