कराडात वीज वितरणचा लाचखोर कारभार चव्हाटय़ावर
प्रतिनिधी/ कराड
शेतीपंपासाठी नवीन वीज कनेक्शन देण्यासाठी पाच हजारांची लाच घेताना वीज वितरण कंपनीचा कनिष्ठ अभियंता रंगेहाथ सापडला. राहूल अशोक सोनवले (रा. हजारमाची, गजानन हौसिंग सोसायटी, कराड) असे त्याचे नाव आहे.
दरम्यान, या कारवाईने वीज वितरण कंपनीतील कारभार चव्हाटय़ावर आला असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून संशयिताची चौकशी सुरू आहे. पोलीस उपअधिक्षक अशोक शिर्के यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार 47 वर्षीय शेतकरी यास नवीन शेतीपंपासाठी वीज कनेक्शन घ्यायचे होते. त्यासाठी ते कराड तालुक्यातील वाठार येथील वीज वितरणच्या शाखेत हेलपाटे मारत होते. कनेक्शन देण्यासाठी त्यांच्याकडे शाखेचे कनिष्ठ अभियंता सोनवले याने पाच हजारांची मागणी केली. याप्रकरणी संबधित शेतकऱयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पोलीस उपअधिक्षक अशोक शिर्के, अविनाश जगताप, हवालदार ताटे, हवालदार येवले यांनी खात्री करून वाठार येथे सापळा रचला. बुधवारी दुपारी राहूल सोनवणे हा पाच हजारांची लाच घेताना रंगेहाथ सापडला. त्याच्याकडून स्विकारलेल्या लाचेची पाच हजारांची रक्कम हस्तगत करण्यात आल्याचे उपअधिक्षक शिर्के यांनी सांगितले.