मसूर येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
प्रतिनिधी/ कराड
आजोबांच्या नावे असलेल्या जमिनीचा सातबारा उतारा व सर्च रिपोर्ट देण्यासाठी दोन हजारांची लाच घेताना तलाठय़ासह खासगी इसम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. मसूर (ता. कराड) येथे ही कारवाई करण्यात आली. तलाठय़ावरील कारवाईने महसूल प्रशासनातील कारभार चव्हाटय़ावर आला आहे.
निलेश सुरेश प्रभुणे (वय 45, रा. संगमनगर, मलकापूर), रविकिरण अशोक वाघमारे (वय 27, रा. मसूर) अशी कारवाई झालेल्यांची नावे आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के यांनी दिलेल्या माहितीनुसार, मसूर येथील एका ग्रामस्थाच्या आजोबांची जमीन आहे. या जमिनीचा सातबारा उतारा व सर्च रिपोर्ट त्यांना हवा होता. त्यासाठी ते मसूरच्या तलाठी कार्यालयात गेले होते. सातबारा उतारा व सर्च रिपोर्ट देण्यासाठी त्यांच्याकडे दोन हजार रूपयांची मागणी करण्यात आली. याविरोधात संबंधित ग्रामस्थाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधिक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के यांनी तक्रारीची खात्री केली. तक्रारीत तथ्य आढळल्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मसूर येथे सापळा रचला. या सापळ्यात दोन हजारांची लाच घेताना दोघांना पकडले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
19 वर्षीय तक्रारदाराने दाखवले धाडस
आजोबांच्या जमिनीचा सातबारा उतारा व सर्च रिपोर्ट घेण्यासाठी 19 वर्षीय तक्रारदार पाठपुरावा करत होता. मात्र त्याच्याकडे दोन हजारांची लाच मागण्यात आली. या 19 वर्षीय तक्रारदाराने धाडस दाखवत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केल्याने हा सापळा यशस्वी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.