एका इसमाने तहसीलदाराच्या वाहनाला दिले पेटवून
वृत्तसंस्था / चेन्नई
तामिळनाडूच्या विल्लुपुरम जिल्हय़ात एका तहसीलदाराच्या वाहनाला पेटवून देण्यात आल्याची घटना घडली आहे. एका इसमाने कार्यालयात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत तहसीलदाराचे वाहन पेटवून दिले आहे.
ही घटना जिल्हय़ातील कंडाचीपुरम तहसीलदार कार्यालयाबाहेर घडली आहे. तेथे बाहेर उभ्या असलेल्या बोलेरो एसयुव्हीला नाराज व्यक्तीने आग लावली आहे. संबंधित वाहन तहसीलदाराचे होते. पोलीस पोहोचेपर्यंत वाहनाच्या आतील हिस्सा जळून गेला होता अशी माहिती अधिकाऱयांनी दिली आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असताना एक व्यक्ती हातात हातोडा आणि पेंट थिनर घेऊन पोहोचल्याचे दिसून आले. त्या व्यक्तीने प्रथम वाहनाच्या काचा फोडल्या, आत थिनर ओतून त्यानंतर आग लावून पळ काढल्याचे स्पष्ट झाले. काही तासांतच पोलिसांनी रंजीत नावाच्या व्यक्तीला अटक केली. तहसीलदाराच्या कार्यालयात भ्रष्टाचार असून प्रत्येक कामासाठी लाच मागितली जात असल्याचे रंजीतने चौकशीदरम्यान सांगितले आहे.
रंजीतने यापूर्वी कार्यालयातील 20 खिडक्यांच्या काचांची तोडफोड केली होती. पण रंजीतला मानसिक आजार असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला असून त्याची मानसिक स्थिती जाणून घेतल्यावरच गुन्हा नेंदविण्यात येणार आहे.