प्रतिनिधी / गडहिंग्लज
चंदगड तालुक्यातील शिरगाव येथे राहणाऱया 13 कुटूंबांना राहण्यासाठी जागा मिळावी यासह अन्य मागण्यांसाठी आज येथील प्रांत कार्यालयासमोर लाडलक्ष्मी कुटूंबांनी धरणे आंदोलन केले. दिवसभर धरणे आंदोलन पार पडले. यावेळी रस्त्यावरच अंगावर ओढलेल्या चाबकाच्या कडाक्याने साऱयांचे लक्ष वेधले होते.
शिरगाव येथून लाडलक्ष्मी खेळ करणाऱया साऱया कुटूंबांनी लहान मुलांसह पायी संघर्ष यात्रा काढली. चंदगड, नेसरी, महागाव मार्गे सोमवारी रात्री ही सारी कुटूंबे गडहिंग्लजच्या प्रांत कार्यालयासमोर दाखल झाली. 50 च्या आसपास त्यांची संख्या होती. सकाळी उठल्यानंतर त्यांनी हलगी वाजवत अंगावर आसूड ओढत आंदोलनाला सुरुवात केली. सुरुवातीस लाडलक्ष्मीचा खेळ असे समजून नागरिकांनी गर्दी केली.
काही वेळाने हे आंदोलन असल्याचे दिसून आले. प्रांताधिकारी विजया पांगारकर पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे बाहेरगावी गेल्याने सायंकाळपर्यंत हलगी वाजविणे आणि आसूड ओढणे हे सुरुच होते. दुपारी 4 वाजता या कुटूंबीयांसोबत प्रांताधिकारी पांगारकर यांनी चर्चा केली. यावेळी आनंदराव कांबळे, बाळेश नाईक, बाळकृष्ण परीट, सुरेश लाडलक्ष्मीकार, मारुती लाडलक्ष्मीकार, शामू लाडलक्ष्मीकार, लक्ष्मण लाडलक्ष्मीकार, हुसेन लाडलक्ष्मीकार आदींनी चर्चेत भाग घेतला. शिरगाव, पाटणे फाटा व अडकूर येथे अनेक वर्षे रस्त्यालगत ही सर्व लाडलक्ष्मीकार कुटूंबे राहतात. रस्ता रुंदीकरणामुळे आणि वाढत्या रहदारीमुळे त्यांचे जीवन असुरक्षीत झाले आहे. शासनाने घरकुलाला जागा द्यावी अशी मागणी केली आहे.
याशिवाय सौरदिवे, उज्ज्वल गॅस, अंत्योदय योजना, संजय गांधी योजना, शैक्षणिक सेवा, आरोग्य सेवा द्याव्यात अशी मागणी करण्यात आली. यावेळी प्रांताधिकारी पांगारकर यांनी उपजिल्हा रुग्णालयाशी संपर्क साधून या साऱया कुटूंबीयांची आरोग्य तपासणी करण्याची सूचना केली. या कुटूंबांना रेशन कार्ड देण्यात आले असून अंत्योदय अंतर्गत धान्य कोठा मिळविण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सांगितले. उज्ज्वल गॅस योजना बंद असल्याने गॅस पुरवठय़ाबाबत होणाऱया अडचणीवर चर्चा झाली.
या कुटूंबांना सौरदिवे देण्यासाठीही प्रयत्नशील असल्याचे सांगितले. सुमारे अर्धा तास या कुटूंबांची चर्चा झाली. या कुटूंबांना जागा देण्यासाठी चंदगडचे तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना सूचना करत असल्याचे सांगितले. चर्चेनंतरही आंदोलन सुरुच होते. प्रांत कार्यालयासमोरच चूल पेटवून आज दिवसभरची गुजराण या कुटूंबांनी केली. लहान मुलांसह मोठय़ांचाही सहभाग असल्याने कडाडणारी हलगी आणि अंगावर आसूड ओढून घेताना होणारा आवाज यामुळे हे आंदोलन चर्चेचे झाले.